पंजाब कारागृहात स्थलांतरासाठी तळोजातील कैद्याला धमकी?; जेल महानिरीक्षकांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:32 AM2019-10-31T01:32:00+5:302019-10-31T01:32:25+5:30

खटल्याच्या सुनावणीत गैरहजर राहण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्याचा दबाव

Threatening prisoner threatened for transfer to Punjab jail? Complaint to Inspector General of Prisons | पंजाब कारागृहात स्थलांतरासाठी तळोजातील कैद्याला धमकी?; जेल महानिरीक्षकांकडे तक्रार

पंजाब कारागृहात स्थलांतरासाठी तळोजातील कैद्याला धमकी?; जेल महानिरीक्षकांकडे तक्रार

Next

जमीर काझी 

मुंबई : खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला मूळच्या पंजाबमधील कारागृहात स्थलांतर होण्यासाठी तुरुंगाधिकाºयाकडून धमकाविण्यात येत आहे. कैद्याच्या बहिणीलाही मुंबई सोडून पंजाबमध्ये निघून जाण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप करत कैद्याच्या बहिणीने थेट तुरुंग उपमहानिरीक्षक दीपक पांडे यांंना साकडे घालत दाद मागितली आहे.

तुरुंगाधिकाºयाविरुद्ध दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील खटल्याची सुनावणी डिसेंबर महिन्यापासून सुरू असून त्या वेळी फिर्यादी कैदी व त्याची बहीण गैरहजर राहिल्यास बचाव पक्षाला मदत होईल, यासाठी तुरुंगाधिकारी श्रीनिवास पातकवाला हे धमकावत असल्याचा आरोप कैदी जोरावर सिंहची बहीण विरेंदर कौर बलकार हिने केला आहे. भावाला कारागृहात त्रास देण्यात येत असून त्याच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी तुरुंग प्रशासन जबाबदार असल्याचे तिने वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याबाबत होणाºया छळाबाबत अलिबाग न्यायालयात मागील तारखेवेळी लिहून दिलेल्या शपथपत्राची प्रतही तिने सोबत जोडली आहे.

१८ आॅक्टोबरला कारागृहात भावाला भेटण्यासाठी गेले असता पातकवाला यांनी आपल्याला पंजाबमध्ये निघून जाण्यासाठी धमकाविले; तसेच भावाला गेल्या काही महिन्यांपासून पंजाबला निघून न गेल्यास तुला व बहिणीला दाखवून देऊ, असे तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून धमकावण्यात येत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

जोरावर सिंह हा गेल्या दीड वर्षापासून तळोजा कारागृहात आहे. त्याला पंजाबमधील एका गुन्ह्यात शिक्षा झाली आहे, तर खारघर येथे एका न्यायाधीशाच्या पत्नीची सुपारी घेऊन खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वर्षभरापूर्वी त्याला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यात तोंडावर जखमा, पायाला फ्रॅक्चर होऊनही जेल प्रशासनाने उपचाराकडे दुर्लक्ष केले होते. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर जेल व रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर ही बाब स्पष्ट झाल्यावर पातकवाला यांच्यासह सहा तुरुंगाधिकारी व एका क्लार्कवर जबर मारहाण करण्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. काहींना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी १३ डिसेंबरपासून पनवेल न्यायालयात सुरू होणार आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असलेले अधिकारी व तुरुंग अधीक्षक एस.एच. कुर्लेकर हे पंजाबमधील न्यायालयात स्थलांतर करण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्याबाबत जोरावर सिंह याने १३ मे रोजी खून खटल्याप्रकरणी अलिबाग जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी ही बाब सांगितली. निघून न गेल्यास स्वत:वर हल्ला करून संपवून घेण्यासाठी धमकावित होते, त्यासाठी आपल्या बराकीतील स्वच्छतागृहात चाकू ठेवण्यात आला होता, असे त्याने न्यायालयात लिहून दिले आहे. याबाबत पुढील सुनावणीत न्यायालय निर्णय घेणार असतानाच पुन्हा तुरुंगाधिकाºयांकडून धमकावण्यात येत असल्याचा विरेंदर कौर यांचा आरोप आहे.

प्रत्यक्ष भेटा मग माहिती देतो - अधीक्षक
कैदी जोरावर सिंह व त्याची बहीण विरेंदर कौर यांना धमकाविण्यात येत असल्याबाबत तळोजा कारागृहाचे अधीक्षक एस.एच. कुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रारदाराच्या आरोपात तथ्य नाही. त्याबाबत फोनवर माहिती देऊ शकत नाही, तुम्ही कार्यालयात येऊन भेटा, असे सांगून त्यांनी फोन कट केला.

कारागृह प्रशासनाकडून जाणीवपूर्वक छळ
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगाधिकाºयाविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या सुनावणीवेळी गैरहजर राहावे, यासाठी भावाचा छळ करण्यात येत आहे. तसेच मलाही दमदाटी करण्यात येत आहे. तुरुंग महानिरीक्षकांनी या प्रकरणी कारागृहातील सीसीटीव्ही फूटेज तपासून योग्य चौकशी करावी, आपल्या भावाची योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी केली जात नाही. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी तुरुंग प्रशासनाची असेल. - विरेंदर कौर बलकार (कैद्याची बहीण)

Web Title: Threatening prisoner threatened for transfer to Punjab jail? Complaint to Inspector General of Prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.