"...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!", शिंदे-सरन्यायाधीशांचा फोटो बघून संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 23:11 IST2026-01-23T23:04:28+5:302026-01-23T23:11:47+5:30
Sanjay Raut on CJI Surya kant and Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले. याच फोटोवरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

"...म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!", शिंदे-सरन्यायाधीशांचा फोटो बघून संजय राऊत संतापले
महाराष्ट्रासह देशभरात गाजलेले शिवसेना चिन्हाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने बुधवारी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. सुनावणी लांबणीवर गेलेली असतानाच आज (२३ जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केलेल्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले. एकनाथ शिंदेंच्या याच पोस्टवर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे विमानतळावर स्वागत करतानाचे फोटो पोस्ट केले. "सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आज विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री.चंद्रशेखर उपस्थित होते", असेही शिंदे म्हणाले.
संजय राऊतांच्या मनात शंका
एकनाथ शिंदे यांची ही पोस्ट रिपोस्ट करत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी "म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!", अशी शंका उपस्थित करत संताप व्यक्त केला.
म्हणुन तीन वर्ष तारीख पे तारीख! https://t.co/IwM5Amj9W3
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 23, 2026
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हांची सुनावणी लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बऱ्याच याचिकांवर बुधवारी (२१ जानेवारी) सुनावणी होणार होती. हे प्रकरण न्यायालयात ३७ व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात सुनावणी सुरू होऊन ती सलग दोन दिवस चालणे अपेक्षित होते.
मात्र, दुसऱ्या एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी जावे लागत असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पक्ष व चिन्हाबाबतची ही याचिका ३ वर्षापासून सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे.
चार आठवड्यांत सुनावणी घेणार -सर्वोच्च न्यायालय
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हांवरील सुनावणी पुढे ढकलताना न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही, त्या सर्व याचिकांवर येत्या चार आठवड्यांत सुनावणी घेतली जाईल.