टी-२०ला लाजवेल असा थरार, मुंबई मनपाच्या ‘या’ वॉर्डात केवळ ७ मतांनी फैसला, रोमांचक लढतीत कोण जिंकलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:14 IST2026-01-17T13:11:29+5:302026-01-17T13:14:00+5:30
Mumbai Municipal Corporation Election Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये शेवटपर्यंत मतमोजणीचा थरार रंगला आणि अगदी अल्प मताधिक्याने जय पराजयाचा फैसला झाला. अशीच एक थरारक लढत सांताक्रूझमधील प्रभाग क्रमांक ९० मध्ये रंगली.

टी-२०ला लाजवेल असा थरार, मुंबई मनपाच्या ‘या’ वॉर्डात केवळ ७ मतांनी फैसला, रोमांचक लढतीत कोण जिंकलं?
अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेरीस भाजपा आणि शिंदेसेना यांच्या महायुतीने बाजी मारली. या महायुतीने ११८ जागा जिंकत बहुमत मिळवले. मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती आणि स्वबळावर लढत असलेल्या काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपा आणि शिंदेसेनेला कडवी झुंज दिली. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये शेवटपर्यंत मतमोजणीचा थरार रंगला आणि अगदी अल्प मताधिक्याने जय पराजयाचा फैसला झाला. अशीच एक थरारक लढत सांताक्रूझमधील प्रभाग क्रमांक ९० मध्ये रंगली.
सांताक्रूझमधील प्रभाग क्रमांक ९० मध्ये भाजपाच्या ज्योती उपाध्याय आणि काँग्रेसच्या ट्युलिप ब्रायन मिरांडा यांच्यात मुख्य लढत झाली. येथे उद्धवसेना, सपा आणि अपक्ष असे इतर उमेदवारही होती. मात्र अखेरच्या टप्प्यात ज्योती उपाध्याय आणि काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांच्यातच अटीतटीची लढत दिसून आली. या लढतीत काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांना ५ हजार १९७ मते मिळाली. तर भाजपाच्या ज्योती उपाध्याय यांना ५ हजार १९० मते मिळाली. अशा प्रकारे काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी अवघ्या ७ मतांनी बाजी मारली.
भाजपाच्या ज्योती उपाध्याय आणि काँग्रेसच्या ट्युलिप ब्रायन मिरांडा यांच्यात झालेली ही लढत मुंबईतील सर्वात कमी मताधिक्याने जय परजयाचा निर्णय झालेली लढत ठरली. याशिवाय भाजपाच्या शितल सुरेश गंभीर यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक १९० मध्ये अवघ्या १२५ मतांनी विजय मिळवला.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये भाजपा ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या. अशा प्रकारे ११८ जागा जिंकत महायुतीने महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले. तर उद्धवसेना ६५ जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युतीने ७२ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने २४ जागांवर विजय मिळवला.