आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 11:21 IST2019-12-15T11:19:09+5:302019-12-15T11:21:12+5:30

'लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची'

MNS leader sandeep deshpande criticized on shiv sena; BJP on Rahul Gandhi's Savarkar jibe | आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने आधी भाजपाची लाचारी केली, आता काँग्रेसची लाचारी करत असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

“शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपाची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी "माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही," असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेदेखील राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय, या वक्तव्यावरून भाजपा राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. 

(केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते यांनीही ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

(उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना जोडे मारावेत; सावरकरांच्या नातवाची संतप्त भावना)

 

Web Title: MNS leader sandeep deshpande criticized on shiv sena; BJP on Rahul Gandhi's Savarkar jibe