शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:27 PM2019-11-22T15:27:56+5:302019-11-22T15:39:01+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.

Maharashtra Government : Congress letter ready to support Shiv Sena, but ... | शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...

Next

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीतील घटक पक्षांसोबत आज बैठक झाली. या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास घटक पक्षांनी समर्थता दर्शविली आहे. या आघाडीच्या बैठकीनंतर दुपारी काँग्रेस नेत्यांची नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक झाली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठीच्या पत्रावर आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. मात्र, या बैठकीत काँग्रसेचा विधीमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया झाली नाही. तसेच, आमदारांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार तयार होत आहे. म्हणजे नेमके काय होत आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय, या बैठकीला दिल्लीतील नेत्यांची हजेरी नव्हती. तर बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड झाली नसून त्याबाबत स्वतंत्र बैठक बोलावणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.  

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना दिल्लीत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने माहिती दिली.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीतील घटक पक्षांसोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यास घटक पक्षांनी समर्थता दर्शविली आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी आम्ही आज बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

या आघाडीच्या बैठकीत काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हेमंत टकले उपस्थित होते. तर घटक पक्षांचे अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, अनिल गोटे, मिनाक्षीताई पाटील, बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. 
 

Web Title: Maharashtra Government : Congress letter ready to support Shiv Sena, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.