...तरच मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य होईल; यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:59 IST2026-04-27T06:59:56+5:302026-04-27T06:59:56+5:30
प्रत्येक शहरात पाण्याच्या निचऱ्यासाठी निसर्गाची एक व्यवस्था असते; परंतु त्यावर अतिक्रमणे होऊन पावसाचे पाणी वाहून नेण्याची तिची क्षमताच कमी झालेली दिसते.

...तरच मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य होईल; यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे
सीताराम कुंटे
माजी मुख्य सचिव
मागील महिन्यात पुण्याला काही कामानिमित्त गेलो असताना तिथे अचानक पाऊस आणि गारा पडू लागल्या. बघता-बघता रस्त्यांवर पाणी तुंबायला लागले. वाहतूक विस्कळीत झाली आणि लोकांचे हाल सुरू झाले. थोड्याफार फरकाने सगळ्याच शहरांची हीच अवस्था आहे. थोड्याशा पावसाने त्रेधातिरपीट उडते. आता पावसाळा जवळ आला आहे आणि मुंबई परिसरातील सर्व शहरांत स्थानिक स्वराज्य संस्था कामाला लागल्या आहेत. येत्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा आणि पाणी तुंबल्याने आर्थिक नुकसान, प्राणहानी, अपघात घडू नयेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात स्थानिक स्वराज्य संस्था कितपत यशस्वी होतील हे समजून कसे घ्याल?
सुरुवातीला जरा जागतिक पातळीवरील काय परिस्थिती आहे, हे समजून घ्यायला हवे. मला आठवतंय की, मुंबईत २६ जुलै २००५ रोजी ढगफुटी आणि अतिवृष्टीने प्रचंड हाल झाले तेव्हा मुंबई महापालिकेवर बरीच टीका झाली. आपली व्यवस्था किती अपुरी असते यावर लिहिले-बोलले गेले; परंतु लगेच काही दिवसांतच अमेरिकेच्या न्यू ऑर्लिंस भागात कतरीना चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले. तिथली व्यवस्था कोलमडून पडली होती. मग इथले टीकाकार काही दिवस गप्प बसले.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येक शहराची एक मर्यादा असते. किती पाऊस सक्षमपणे हाताळता येईल याचंही अभियांत्रिकी गणित असतं. त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास व्यवस्था अपुरी पडू शकते. जुलै २००५ च्या ढगफुटीने हेच दाखवून दिले की एका मर्यादेबाहेर पाऊस झाल्यास पाणी तुंबणार. त्यामुळे लोकांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः वेधशाळेने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेणे आणि अतिवृष्टीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळणे इत्यादी. हे तर झाले नैसर्गिक आपत्तीत उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत मात्र, आता अनेक शहरांत थोड्या पावसातच पाणी साचणे, वाहतूक कोंडी होणे आणि अपघात होणे आदी प्रकार घडत आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. त्यासाठी प्रशासन आणि नागरिक समान भागीदार असल्याचे जाणवते.
प्रत्येक शहरात पाण्याच्या निचऱ्यासाठी निसर्गाची एक व्यवस्था असते; परंतु त्यावर अतिक्रमणे होऊन पावसाचे पाणी वाहून नेण्याची तिची क्षमताच कमी झालेली दिसते. रेड लाइन, ब्लू लाइन अशी पुराची शक्यता दर्शविणारे नकाशे शासनाने काढले असले तरी लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि धोकादायक क्षेत्रात राहती घरे आणि व्यावसायिक गाळे बांधतात. त्यामुळे थोड्या पावसातही शहरात प्रचंड पाणी तुंबते. याशिवाय प्रत्येक शहराचा भूभाग कुठल्या तरी बांधकामाने व्यापला आहे. इमारती तर आहेतच, तसेच रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण झाले आहे. सोसायट्यांतील खुल्या जागेत पेव्हर ब्लॅाक लागले आहेत, अगदी बागेत किंवा मैदानात कुठले ना कुठले बांधकाम केलेले असते. या सर्व कारणांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता त्याचा ‘रन-ऑफ’ तयार होतो आणि पाणी वाहून ठराविक भागात साचायला लागते.
बऱ्याचदा नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी तुंबते. म्हणून सर्वच यंत्रणांनी मे महिन्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येक शहरात अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा आहेत. ज्यांच्यामुळे जबाबदारी विभागली जाते आणि उत्तरदायित्व नेमकं निश्चित करता येत नाही. प्रत्येक यंत्रणा दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली सुटका करू घेते आणि सामान्य नागरिक भरडला जातो. त्यामुळे ‘द बक स्टॅाप्स हियर’ असा प्रत्येक शहरात एक जबाबदार अधिकारी असावा ज्याने सर्व यंत्रणांशी समन्वय साधून येणारा पावसाळा सामान्यजनांसाठी सुसह्य करावा.
यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे
सर्वांत महत्त्वाचं आहे शहरात चालू असलेली पायाभूत सुविधांची कामे. रस्ते, मेट्रो, पाइपलाइन, ब्रिज अशी अनेक कामे चालू असतात. पावसाळ्यापूर्वी ती सुरक्षित टप्प्यावर आणून ठेवली पाहिजेत. मात्र, या संदर्भात सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होते. अतिघाई आणि बेजबाबदारपणामुळे कामाचे डेब्रीज पावसाळ्यात वाहून नाल्यांमध्ये जाते आणि ठिकठिकाणी पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरते. शिवाय अपूर्ण कामे वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू शकतात. याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहण्याची गरज आहे.