LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:21 IST2026-03-10T19:19:20+5:302026-03-10T19:21:45+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अमित साटम यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव!
Lokmat Maharashtrian of the year awards 2026: मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि धडाडीचे नेतृत्व अमित साटम यांना प्रतिष्ठेच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीमध्ये त्यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी राजकारण (प्रॉमिसिंग) या विभागातून आमदार अमित साटम यांना सर्वोकृष्ट कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
अमित भास्कर साटम हे भाजपचे तरुण, अभ्यासू, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय वारसा नसताना २००० साली एका सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. आशादायक कॉर्पोरेट कारकीर्द सोडून सार्वजनिक जीवनाची वाट निवडताना समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले.
टाटा समूहात व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या साटम यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र व समाजशास्त्रात पदवी तसेच एमजीएम इन्स्टिट्यूटमधून मानव संसाधन व्यवस्थापनात एमएमएस पदवी प्राप्त केली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव, स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकारी सहाय्यक, अंबोली विधानसभा अध्यक्ष, युवा मोर्चा सरचिटणीस आणि मुंबई युवा अध्यक्ष अशा विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
२०१२ ते २०१७ या काळात ते बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेवकांपैकी एक होते. २०१४ पासून अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा (२०१४, २०१९, २०२४) आमदार म्हणून निवडून येत त्यांनी या मतदारसंघाचे सर्वाधिक काळ प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
सार्वजनिक धोरणनिर्मितीतील तज्ज्ञ म्हणून त्यांनी एएलएम गट व नागरिक संघटनांशी संवाद साधत जनआंदोलन उभे केले. त्यानंतर २०१४ मधील १४८ तासांच्या उपोषणामुळे मुंबईत एलईडी रस्तेदिवे बसविण्याचा निर्णय झाला. युटिलिटी कॉरिडॉरची संकल्पना, ६० हून अधिक उद्याने व मैदाने विकसित करणे आणि गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत केलेला निर्णायक हस्तक्षेप ही त्यांची ठळक कामगिरी आहे. विधानसभेतील प्रभावी भाषणे आणि भ्रष्टाचाराविरोधातील निर्भीड भूमिका यामुळे ते चर्चेत राहिले; मुंबई महापालिकेतील मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांवर त्यांनी प्रकाश टाकला होता.
दुसऱ्या कार्यकाळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट संसदसदस्य पुरस्कार’ तसेच ‘आदर्श आमदार पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला. २५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची भाजपा मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाली. विकासाभिमुख, पारदर्शक आणि समृद्ध मुंबई घडवण्याच्या ध्येयाने ते आजही सक्रियपणे कार्यरत आहेत.