शहरातील कचरा संकलनासाठी ‘जीआयएस’ मॉडेल विकसित करा - महापालिका आयुक्त अश्विनी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:02 IST2026-04-30T12:01:37+5:302026-04-30T12:02:18+5:30
कचरा वर्गीकरणासाठी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश

शहरातील कचरा संकलनासाठी ‘जीआयएस’ मॉडेल विकसित करा - महापालिका आयुक्त अश्विनी भिडे
मुंबई : शहरातील जास्त कचरा गोळा होणारी ठिकाणे विशेषत: दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्टी विभागांचे निरीक्षण करून त्याची भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली (जीआयएस) तयार करा, तसेच त्या वॉर्डमध्ये रस्त्यांवरील कचरा संकलनाचा आराखडा तयार करून, त्यावर आधारित मॉडेल विकसित करा, असे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले. त्याचबरोबर कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवून लक्ष ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली.
स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी आयुक्त भिडे बुधवारी पहाटे रस्त्यावर उतरल्या. यावेळी वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कचऱ्याचे वर्गीकरण-वहन कोणत्या पद्धतीने केले जाते, याबाबत माहिती घेतली.
‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर अभियान राबवावे, विविध संकुलांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र नियोजन करणे, कचरा वर्गीकरणाबाबत विशेषतः दाटवस्ती भागात व्यापक जनजागृती करणे, तसेच ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान परिणामकारकपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना भिडे यांनी केल्या. दरम्यान, या पाहणीवेळी परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे, आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त प्रशांत गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहर स्वच्छतेसाठी ‘त्रिसूत्री’वर लक्ष केंद्रीत
मुंबईतील स्वच्छता दिसण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण आणि वहन या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छतेत नवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) या सारख्या संस्थांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे अभ्यासगट तयार करा, असेही त्यांनी सांगितले.