CoronaVirus: आनंदवार्ता! राज्यात ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९०वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 09:19 PM2020-04-03T21:19:43+5:302020-04-03T21:26:04+5:30

आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे  येथील आणि २ जण मुंबई  येथील आहेत. 

CoronaVirus: 50 patients in the state recover and return home; Total patient numbers at 490 vrd | CoronaVirus: आनंदवार्ता! राज्यात ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९०वर

CoronaVirus: आनंदवार्ता! राज्यात ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९०वर

googlenewsNext

मुंबई- आज राज्यात ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई येथील असून, १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे. आज राज्यात ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे  येथील आणि २ जण मुंबई  येथील आहेत. राज्यात ५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर  ६७ नवीन रुग्ण आज समोर आले असून, ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

वसई विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा २९ मार्च २०२० रोजी येथील एका खासगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वडयात अमेरिकेहून आला होता, पण  भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता. बदलापूर ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खासगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. तिचा कोणत्याही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता. 
जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगावमधील कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब होता आणि १ महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही प्रदेश प्रवास केलेला नव्हता. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षांच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६ झाली आहे. 


राज्यात आज एकूण ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२८५८ नमुन्यांपैकी ११९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५०करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८,३९८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून, त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत, तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यातील ३० रुग्णालयांना कोविड १९ उपचाराबाबत आदेशित करण्याबाबतचे नोटिफिकेशनही नुकतेच काढण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: 50 patients in the state recover and return home; Total patient numbers at 490 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.