पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाचे संक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:05 AM2020-06-01T07:05:40+5:302020-06-01T07:05:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील टिष्ट्वटर सेलमध्ये कोरोनाने संक्रमण केले आहे. ८ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह ...

Corona transition to police control room | पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाचे संक्रमण

पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाचे संक्रमण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील टिष्ट्वटर सेलमध्ये कोरोनाने संक्रमण केले आहे. ८ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यापैकी एक योद्धा कोरोनावर मात करत पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला आहे.


रविवारी पहाटे चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १८३ अधिकारी आणि १२३८ अंमलदार अशा एकूण १४२१ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २६ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यापैकी १६ हे मुंबई पोलीस दलातील आहेत. तर मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर सेलमध्येही कोरोनाने संक्रमण केले. यापैकी पोलीस शिपाई दुर्गेश सावंत हा योद्धा कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत हजर झाला आहे. तर अन्य ८ जणांवर उपचार सुरू असून तेही लवकरच बरे होतील. मरोळ येथे पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयातून ४६ पोलिसांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटरद्वारे दिली.


एकीकडे मुंबई पोलीस जीव धोक्यात घालून कार्यरत असताना, नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या बदलीने पोलिसांत संतापाचे वातावरण आहे. अबू आझमी यांनी शर्मा यांच्याबाबत केलेले चुकीचे वक्तव्य, त्यात बदलीची दिलेली धमकी, त्यानंतर, खाकीविरुद्ध बोलणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी कर्तव्यनिष्ठ अशा शर्मा यांची बदली होणे एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करणारी बाब असल्याचेही मत बंदोबस्तावरील महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तर शर्मा यांनी मात्र त्याच जोशाने चेंबूर पोलीस ठाण्यात काम सुरू केले आहे.
...आणि ते कुटुंबीयही परतले
समतानगर पोलीस ठाण्यातील पोलिसासह त्याची पत्नी आणि दोन मुले यांनाही कोरोनाची बाधा झाली. अखेर, या कुटुंबीयांनीही कोरोनावर मात करत घर गाठले. स्थानिकांनी फुलांचा वर्षाव करत या चिमुकल्यांसह त्यांच्या पोलीस आईबाबांचे स्वागत केले. यावेळी हे पोलीस कुटुंबीय भारावून गेले होते.


राज्य पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात ९८ हजार कॉल
राज्यभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तब्बल ९८ हजारांहून अधिक कॉलची नोंद झाली आहे. यात मुंबई, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सर्वाधिक कॉल आले आहेत. राज्यभरात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख २० हजार गुन्हे नोंद असून, विविध कारवाईत तब्बल ६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच होम क्वॉरंटाइन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७०६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याचबरोबर अवैध वाहतूक प्रकरणी १३२३ गुन्हे नोंद असून २३ हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तर ७६४४५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईबरोबरच पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील योद्धे नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत राज्यभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तब्बल ९८ हजार ४६१ कॉलची खणखण झाली. यात, कोरोनासंदर्भातील विविध तक्रारींचा समावेश आहे.

Web Title: Corona transition to police control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.