मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 05:40 IST2026-02-12T05:39:39+5:302026-02-12T05:40:30+5:30
नगरसेवकांना सभागृहात जागा न मिळाल्याने गदारोळ, शिंदेसेनेच्या नगरसेवकांचा सभागृहातील वावर अत्यंत आक्रमक होता. त्यातून आरोप-प्रत्यारोपही झाले

मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..!
मुंबई - तब्बल ४४ वर्षांनंतर आपला महापौर बसवत भाजपने मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला. इतक्या वर्षांत जे कोणाला जमले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिंदेसेनेचे संजय घाडी यांच्या निवडीची औपचारिकता बुधवारी पार पडली. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
७ मार्च २०२२ पासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट या घोषणेने संपुष्टात आली आहे. २०२२ मध्ये उद्धवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौरपदावरून पायउतार झाल्या, तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक राज होते. उद्धवसेनेने महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात आलेल्या नगरसेवकांना बसायला जागा नसल्याने प्रचंड गदारोळ झाला. उद्धवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे आक्षेप नोंदवला. तो त्यांनी फेटाळला. उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाच्या प्रती उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी फाडत सभागृह सोडले. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. शिंदेसेनेच्या नगरसेवकांचा सभागृहातील वावर अत्यंत आक्रमक होता. त्यातून आरोप-प्रत्यारोपही झाले.
आम्ही मराठी चेहरा दिला
भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला अस्सल मराठी महापौर दिला आहे. महापालिकेत पारदर्शक कारभार केला जाईल असे सांगत आम्ही मुंबईकरांकडे मते मागितली होती. मुंबईच्या जनतेने त्याला प्रतिसाद देत भाजपला ही संधी दिली आहे. त्यानुसारच आजचे पदारोहण संपन्न झाले आहे. रितू तावडे यांनी मुंबईकरांचे प्रश्न मांडले आहेत. त्यांना प्रश्नांची जाण आहे. त्या मुंबईला सक्षम नेतृत्व देतील. महायुतीचे महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईच्या विकासाला आम्ही चालना दिली. त्याची पोचपावती मुंबईकरांनी आम्हाला दिली आहे. मागील २५ वर्षे जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्यांना गेल्या काही वर्षांत विकास दिसून आला. बाकी गोष्टी मी आज बोलणार नाही; पण मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रेक्षक गॅलरीत
पालिका सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महापौर निवडीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम, शिंदेसेनेचे सरचिटणीस माजी खा. राहुल शेवाळे सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित होते.
महापौर, उपमहापौर सिद्धिविनायकाला, शिंदेसेनेचे नगरसेवक स्मृतिस्थळावर
महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांनी सायंकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या दोघांसह भाजपचे गटनेते गणेश खणकर व शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले यांच्यासह काही नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गेले.
म्हणून भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली
देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख होतो. हिमाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, गोवा अशा अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मुंबईचे बजेट जास्त आहे. २०२५-२६ चे गोव्याचे एकूण बजेट २८,१६२ कोटी रुपये, अरुणाचलचे ३९,८४२ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशचे ५८,५१४ कोटी रुपये, तर मुंबई महापालिकेचे ७४,८०० कोटी रुपये आहे. त्यामुळे या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.