बेस्ट, सुधार समिती निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 19:21 IST2020-10-01T19:21:21+5:302020-10-01T19:21:58+5:30

जुन्या मित्रपक्षाला मात देण्यासाठी ऐनवेळी भाजपाने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

BJP, Congress will play against Shiv Sena in the Best, Reforms Committee elections | बेस्ट, सुधार समिती निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस सामना रंगणार

बेस्ट, सुधार समिती निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस सामना रंगणार

मुंबई -  बेस्ट आणि सुधार या दोन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठीही काँग्रेस आणि भाजपाने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही समित्यांमध्ये भाजपापेक्षा शिवसेनेकडे दोन अधिक संख्याबळ आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीमुळे भाजपाचे हात बळकट झाले आहेत. जुन्या मित्रपक्षाला मात देण्यासाठी ऐनवेळी भाजपाने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पहारेकर्‍यांची भूमिका स्वीकारणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकांमध्ये समिती अध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले नव्हते. तसेच राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेवर असल्याने काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र यावर्षी उभय दोन्ही पक्षांकडून शिवसेनाविरोधात उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. बेस्ट' समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे आणि सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी पालिका चिटणीसांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. 

तर बेस्टसाठी भाजपाकडून प्रकाश गंगाधरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पक्षाकडून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधार समिती अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी तर भाजपाकडून विनोद मिश्रा यांनी अर्ज सादर केला. स्थायी समितीनंतर महत्त्वाच्या समित्या असलेल्या सुधार व बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक ६ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.

शिवसेनेसमोर पेच....काँग्रेस निर्णायक
शिवसेनेकडे सर्वाधिक ९५ संख्याबळ असल्याने सर्वच समित्यांमध्ये त्यांचे भाजपापेक्षा दोन सदस्य अधिक आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची मनधरणी करून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडता येईल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेची अवघी दोन मत देखील निर्णायक ठरणार आहेत.

असे आहे संख्याबळ.....
'बेस्ट' समितीमध्ये शिवसेना ८, भाजप ६, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. तर सुधार समितीत शिवसेना १२, भाजप १०, काँग्रेस २, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. भाजप ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेला धक्का देऊ शकतो.

Web Title: BJP, Congress will play against Shiv Sena in the Best, Reforms Committee elections