Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:56 IST2026-01-11T12:55:22+5:302026-01-11T12:56:32+5:30
Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव येथील महानगरपालिकेचे मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे.

Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
मालेगाव येथील महानगरपालिकेचे मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. उमेदवारांकडून प्रचाराचा वेग वाढविण्यात आला आहे, तर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार मुफ्ती महमंद इस्माइल यांच्यासह माजी आमदार आणि माजी महापौर, उपमहापौर प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. मंत्री दादा भुसे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
येथील मनपा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडाला असून, या प्रचारफेऱ्या, सभांनी निवडणुकीत रंग भरले आहेत. आणखी काही नेत्यांच्याही सभा नियोजित आहेत. मात्र, सध्यातरी स्थानिक पातळीवर आपापल्या उमेदवारांच्या मदतीला मंत्री दादाजी भुसे व विद्यमान आमदार मुफ्ती यांचा समावेश आहे.
माजी महापौर, उपमहापौर
आजी-माजी महापौर, उपमहापौर देखील रणांगणात उतरल्याने स्थानिक पातळीवर या नेत्यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे दिसते. निवडणुकीत शालेय मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना निवडणूक रिंगणात आहे. त्यांनी मनपाच्या ६ प्रभागातून २४ उमेदवार दिले आहेत. मागील निवडणुकीत १२ जागा मिळाल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळविण्यासाठी भर द्यावी लागणार २ आहे. त्यामुळे मंत्री भुसे यांच्यासह त्यांचे दोन्ही मुले देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. भुसे यांनी आतापर्यंत ४ ते ५ सभा घेतल्या आहेत. यापुढेही त्यांच्या सभा सुरूच राहणार आहेत. तर, दुसरीकडे त्यांचे दोन्ही मुले रोज वेगवेगळ्या प्रभागांत जाऊन प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत.
स्थानिक नेतेही उतरले प्रचाराच्या मैदानात
भाजपने या निवडणुकीत २५ उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, अद्वय हिरे, प्रमोद बच्छाव व प्रसाद हिरेंवर आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचाराच्या शुभारंभासाठी शहरात आले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते फिरकले नसले, तरी स्थानिकांनी प्रचार हाती घेतला आहे. पक्षाने शुक्रवारपासून सभांवर जोर दिला असून, होळी चौकात झालेल्या प्रचार सभेत हे चौघे एकाच व्यासपीठावर दिसून आले. शिंदेसेना, राष्ट्रवादी, उद्धवसेना यांच्या उमेदवारांसाठी स्थानिक पातळीवरील नेते प्रचाराची रणनिती आखत असून प्रचारात रंगत चढत आहे.
आमदार मुफ्तींवर एमआयएमची मदार
मनपा निवडणुकीत सर्वात जास्त ६१ उमेदवार एमआयएमने दिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी एकदा शहरात येऊन गेले आहेत. मात्र त्यांची खरी मदार आमदार मुफ्ती यांच्यावरच आहे. आमदार मुफ्ती यांनी आतापर्यंत ५ पेक्षा जास्त ठिकाणी सभा व बैठका घेतल्या आहेत. याबरोबरच उमेदवार निहाय प्रभागात ते स्वतः सक्रिय सहभागी होताना दिसतात.
खासदार शोभा बच्छाव प्रचारात दिसेना..
मनपासाठी काँग्रेसने यंदा १९ १ जणांना निवडणूक रिंगणात उत्तरविले आहे. त्यांच्या प्रचाराची धुरा मुख्यत्वे शहराध्यक्षांकडे आहे.
शहराध्यक्ष एजाज बेग यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य निवडणूक रिंगणात आहे. त्यात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी शहरात सभा घेलेली नसली, तरी त्यांनी बैठका आणि गाठीभेटी घेतल्या आहेत. परंतु, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येते.