Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहराच्या पूर्व-पश्चिम भागांत रंगणार दुरंगी लढती,आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:34 IST2026-01-08T15:34:01+5:302026-01-08T15:34:42+5:30
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावात एकूण ८४ जागा असून, एक उमेदवार बिनविरोध असल्याने ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत.

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहराच्या पूर्व-पश्चिम भागांत रंगणार दुरंगी लढती,आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला
मालेगाव : मालेगाव महापालिकेत सात प्रमुख पक्षांमध्ये लढत असून, बहुतेक प्रभागांत वेट लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्व भागात आजी-माजी आमदार, तर पश्चिम भागात भाजप-शिंदेसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मालेगावात एकूण ८४ जागा असून, एक उमेदवार बिनविरोध असल्याने ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत.
महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१७ साली आजी माजी आमदार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. तेव्हाची निवडणूक माजी आमदार पै. रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरुद्ध आमदार मौलाना मुफ्ती महमंद इस्माईल यांच्या महागठबंधनमध्ये झाली होती. तेव्हा आमदार मुफ्ती हे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते. त्यांनी जनता दल सेक्युलरशी युती करून महागंठबंधन केले होते. त्यावेळी विद्यमान काँग्रेसचे शहाराध्यक्ष एजाज बेग हे त्यांच्यासोबत होते. त्या निवडणुकीत या दोघांमध्ये लढत होऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने २८ जांगावर बाजी मारली होती.
आजी-माजी आमदारांचे पालिकेसाठी सत्तासमीकरण
मनपाच्या २१ प्रभागांत प्रत्येकी ४ जागा असून, १६ प्रभाग हे पूर्व भागात आहेत. याठिकाणी मनपाच्या ६४ जागा आहेत. तेथेच मनपाच्या सत्तेसाठी खरी लढत होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत पूर्व भागात माजी आमदार आसीफ शेख व विद्यमान आमदार मुफ्ती महमंद यांच्यात सत्तेसाठी खरी चुरस असून, गेल्या निवडणुकीत जनता दलाच्या माध्यमातून आ. मुफ्ती यांच्याबरोबर असलेले मुस्तकीन डिग्निटी समाजवादीच्या माध्यमातून माजी आमदार शेख यांच्याबरोबर आहेत. या भागात या दोघांमध्ये खरी चुरस असून, त्यांच्याविरोधात तिसरा पक्ष म्हणून एजाज बेग यांच्या काँग्रेसचा नंबर लागतो.
दिग्गजांच्या लढती ठरणार लक्षवेधी
निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असल्याने अनेक माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असून काहीं नवे चेहरे देखील आहेत. यामध्ये बहुतेक राजकीय वारसा असलेले उमेदवार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये लक्षवेधी लढती होत आहे. आजी-माजी आमदारांमध्ये वर्चस्वासाठी चुरस आहे. शिवाय पक्षांतरानंतर आपली राजकीय ताकद अधोरेखीत करण्याची संधी असल्याने अनेक मोठे नेते आपल्या राजकीय स्थैर्यासाठी देखील निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
पश्चिम भागात भाजप-शिंदेसेना एकमेकांविरोधात
शहराच्या पश्चिम भागात भाजप-शिंदेसेना, शिवसेना-उद्धवसेना दोन्ही राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात असून, या भागात स्थानिक पातळीवर एकही पक्ष नाही, त्यात भाजप-शिंदेसेनेचा जनाधार मोठा असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजप व तत्कालीन शिवसेना हे दोघे स्वबळावर लढले होते. त्यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने १२ जागांवर विजय मिळविला होता. तर भाजपला ९ आगा मिळाल्या होत्या.
यंदा मात्र तशी परिस्थिती नसली तरी राज्यात महायुतीच्या या दोघा घटक पक्षांमध्ये युतीवरून एकमत न झाल्याने ते दोघे स्वबळावर निवडणुकीस सामोरे जात आहेत. त्यात यंदा मात्र शिवसेनेऐवजी शिंदेसेना व भाजप असा बदल झाला असून, गेल्या निवडणुकीत भुसे यांचे कट्टर सहकारी प्रमोद बच्छाव हे भाजपत आहेत. त्यात प्रसाद हिरे यांच्या समावेशाने भाजपच्या गेल्या निवडणुकीत नेतृत्व करणारे सुनील गायकवाड व अद्वय हिरे यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे यंदाही या दोघांमध्येच खरी लढत होणार, हे निश्चित झाले आहे.