Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहरात मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:05 IST2026-01-11T13:05:04+5:302026-01-11T13:05:55+5:30
Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा सुरू झाला तरी अपवाद वगळता अनेक उमेदवारांना संपूर्ण प्रभागात दौरा करता आलेला नाही.

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहरात मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा सुरू झाला तरी अपवाद वगळता अनेक उमेदवारांना संपूर्ण प्रभागात दौरा करता आलेला नाही. विस्तारलेला प्रभाग आणि प्रभागातील महत्त्वाच्या चौकात आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास लागणारा वेळ यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. मतदानाला कमी दिवस राहिल्याने उमेदवार रात्रीचा दिवस करत आहेत.
येथील ८४ नगरसेवकांसाठी निवडणूक सुरू असून, त्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. प्रचार करण्यासाठी १३ जानेवारीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या आगामी ५ दिवसांत त्यांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.
त्यात शहराच्या पश्चिम भागात नववसाहत असल्याने प्रभागाची लांबी हे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशी आहे. त्यात २० ते २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड करावी लागत आहे. येथील मनपा निवडणूक पूर्व-पश्चिम भागात लढली जाते. त्यात पूर्व भागात सभांवर जोर देण्यात येत आहे. यात इस्लाम, समाजवादी, एमआयएम व काँग्रेस आदी पक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी
उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने कॉर्नर बैठका व सभांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी पश्चिम भागात अद्याप सभा झालेल्या नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार फेन्यांवर जोर दिला जात आहे. या भागात आगामी एक-दोन दिवसांत प्रचार सभांना सुरुवात होऊन शेवटच्या टप्प्यात सभांवर भर दिल्याचे दिसत आहे.
उमेदवारांना स्वतंत्रपणे प्रचार करण्याची वेळ आल्याने त्यांचीही धावाधाव होत आहे. सकाळपासून कार्यकर्त्यांवर तसेच कुटुंबातील सदस्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवून उमेदवार देखील प्रचाराच्या मोहिमेवर निघत आहेत. याशिवाय आगामी दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात होणाऱ्या सभांवर राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा अवलंबून असणार आहे. रविवारी सुटीच्या दिवशी होणान्या प्रचाराच्या माध्यमातून मालेगाव शहरात प्रचाराचा धुराळा उडणार आहे.'
नवखे उमेदवार, नाराजी अन् मतविभागणीवर गणित
शिंदेसेना व भाजपने या निवडणुकीत उमेदवारी देताना काही माजी नगरसेवकांना दूर करत नवीन चेहरे दिले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना डावलल्याचा व घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. अशा या पक्षीय उमेदवारांबरोबरच काही उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचा त्या-त्या भागातील जनसंपर्क चांगला असल्याने मताची विभागणी होण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटामुळे शिंदेसेनेला गेल्या निवडणुकीतील १२ जागा, तर भाजपला ९ जागा टिकविण्याच्या आव्हानाबरोबरच एकमेकांवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी शिकस्त करावी लागत आहे.