मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:12 IST2026-01-12T16:12:00+5:302026-01-12T16:12:41+5:30
Malegaon Municipal Election 2026 : उमेदवारांच्या प्रचार रॅली, घोषणाबाजी, प्रचार गीतांचे आवाज आणि प्रचारपत्रकांनी संपूर्ण परिसरात प्रचाराचा धुरळा उडाला होता.

मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त!
मालेगाव येथील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात पोहोचला आहे. मतदानापूर्वी अखेरचा रविवार असल्याने सार्वजनिक सुटीचा मुहूर्त साधत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांच्या प्रचार रॅली, घोषणाबाजी, प्रचार गीतांचे आवाज आणि प्रचारपत्रकांनी संपूर्ण परिसरात प्रचाराचा धुरळा उडाला होता.
सकाळपासून सुरू झालेला प्रचार सायंकाळपर्यंत सुरू होता. कुठे रॅली, तर कुठे घरोघरी प्रचार आणि काही ठिकाणी कॉर्नर सभा घेत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने मालेगावात रविवारी सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरू असल्याने रविवारचा दिवस प्रचाराचा सुपर संडे ठरला.
येथील महापालिकेची एक जागा बिनविरोध झाल्याने २१ प्रभागांतील ८३ जागांसाठीची निवडणूक होत आहे. निवडणुकीचे वातावरण शिगेला पोहोचले असून, सर्वच उमेदवार प्रचारात आघाडी घेण्यासाठी प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता प्रचार संपणार असल्याने पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी होणार असल्याचे दिसत आहे. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने अनेक मतदार घरीच भेटतील यासाठी उमेदवार सकाळपासूनच घराबाहेर पडले होते.
डिजिटल प्रचाराचा जोर
या निवडणुकीत समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. उमेदवारांनी समाजमाध्यमांतील प्रचारासाठी खास टीम नियुक्ती केली आहे. हे सोशल मीडिया प्रचारक दिवसभर सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रचारात रंगत भरत आहेत. याशिवाय मतदारांसाठी टेली मार्केटींग देखील केले जात आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
सर्वच राजकीय पक्षाबरोबर अपक्ष उमेदवारांनी सभा, बैठका, प्रचार फेऱ्या आदी माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील सर्व प्रभागांत दिवसभरात एकापाठोपाठ एक अशी उमेदवारांच्या प्रचाराची रीघ सुरूच होती. मालेगावात दिवसभर प्रचारफेरी आणि सभांनी वातावरण निवडणूकमय झाले होते.
राजकीय पक्षांतील उमेदवारांमध्ये लागली चढाओढ
मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे. रविवारी मालेगाव कॅम्प, आयशा नगर, मदनी नगर, नया इस्लामपूरा, गोल्डन नगर, भायगाव, रमजान पुरा आदि मागातून उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढल्या, प्रचाराची वाहने, प्रचार पत्रके आणि पक्षीय झेंडा हातात घेऊन उमेदवारांनी प्रभागात प्रचार केला. सकाळपासून सुरू असलेली प्रचाराची लगबग सायंकाळपर्यंत सुरू होते. सायंकाळी प्रचार सभांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
दिवसभरात ६० परवानग्या
मतदानासाठी अखेरचा रविवार असल्याने सर्वांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन केले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या एक दिवस आधीच काढून ठेवल्या होत्या. दिवसभरात ६० प्रचाराच्या परवानग्या देण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले विशेष म्हणजे हे परवानगी अर्जाचा ओघ सुरूच होता. या दिलेल्या परवानग्यांमध्ये सभांचा समावेश मोठा नसला तरी बैठका, घरोघरी प्रचार, कॉर्नर मीटिंग आदींची संख्या मोठी होती. दुपारी एकपर्यंत दोन प्रचार रॅल्यांना परवानगी देण्यात आलेली असून, यात एक भाजप, तर एक एमआयएम यांचा समावेश होता. शहरात शेवटच्या म्हणजे मंगळवारी मोठ्या प्रमाणावर प्रचार रॅली काढण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.