"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:30 IST2026-01-05T10:30:10+5:302026-01-05T10:30:35+5:30
Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात ओवेसींची तोफ धडाडली. नवनीत राणा यांच्या 'चार मुलांच्या' आवाहनावर ओवेसींनी बोचरी टीका केली असून अजित पवारांवरही निशाणा साधला आहे.

"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
अमरावती: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राष्ट्रीय नेत्यांच्या एन्ट्रीने राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज अमरावतीत जाहीर सभा घेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय?" अशा शब्दात त्यांनी राणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदूंना आवाहन केले होते की, "जर ते १९ मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत." राणांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच विधानाचा धागा पकडून ओवेसींनी अमरावतीच्या सभेत पलटवार केला.
ओवेसींचा नवनीत राणांवर निशाणा
सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, "मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात ४ मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात." त्यांनी पुढे जोडले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांनी जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात आहे.
अजित पवारांवरही बोचरी टीका
ओवेसींनी आपल्या भाषणात महायुतीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. "जे आपल्या काकांचे (शरद पवार) झाले नाहीत, ते तुमचे काय होणार?" असा सवाल त्यांनी मतदारांना केला. "आता 'घड्याळाची' वेळ गेली असून 'पतंग' उडवण्याची वेळ आली आहे," असे म्हणत त्यांनी मतदारांना एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. "लोक मला म्हणतात मी भाजपची बी टीम आहे. पण मी कोणाची टीम नाही, मी तर अल्लाचा पुतळा आहे आणि लोकांसाठी काम करायला आलो आहे," असे उद्गार त्यांनी काढले.