कसबा पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड, कोण जिंकणार? भाजपा की काँग्रेस, शरद पवारांचं मोठं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 14:11 IST2023-02-24T14:10:45+5:302023-02-24T14:11:33+5:30
Kasba Peth By-Election: कसबा मतदारसंघात अंतर्गत नाराजीमुळे भाजपाचा पराभव होईल, अशी चर्चा सुरू आहे. आता याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं भाकित केलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड, कोण जिंकणार? भाजपा की काँग्रेस, शरद पवारांचं मोठं भाकित
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे सध्या राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या मतदारसंघामध्ये आहे. राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेली ही दुसरी पोटनिवडणूक असल्याने सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. तसेच दोन्ही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोमाने प्रचार होत आहे. दरम्यान, कसबा मतदारसंघात अंतर्गत नाराजीमुळे भाजपाचा पराभव होईल, अशी चर्चा सुरू आहे. आता याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं भाकित केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील चिंडवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघामध्ये भाजपाचा पराभव होईल, अशी चर्चा आहे, असं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता शरद पवार म्हणाले की, मी काही सांगू शकत नाही. कुठली जागा जाईल ते तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे. कसब्यामधील अनेक लोकांनी मला सांगितलं की, यावेळच्या पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे अर्थकारण होत आहे, तसं अर्थकारण याआधी कधीही पाहिलेलं नाही. ही निवडणूक आपल्या हातून गेली आहे, अशी भाजपाला भीती असावी, असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांचा या भागात दबदबा आहे. तसेच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने भाजपाच्या मतदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. तर २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे. तर या मतदानाचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होणार आहे.