ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:03 IST2026-01-06T08:02:24+5:302026-01-06T08:03:49+5:30
मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले.

ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
MNS Amit Thackeray: अमित ठाकरे सोलापूरला गेले होते. तिथल्या मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा महापालिका निवडणुकीत खून झाला. त्याच्या कुटुंबीयांना अमित ठाकरे भेटले. अमितला पाहून मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. कोणाचेही मन हेलावेल असे ते दृश्य होते.
अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले. त्या परिस्थितीत सुद्धा ते सगळे वातावरण मोबाईल मध्ये शूट करणारे काही महाभाग तेथे होते. अमित यांनी त्यांना तेथून बाहेर काढले. शूटिंग करू नका, असे सांगितले.
निवडणुकीच्या नावाखाली कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे खून होणार असतील तर अशा निवडणुका आम्हाला नको... आम्ही सगळे अर्ज परत घेतो... तुम्हीच जिंका... अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरवदे यांच्या घरात आणि नंतर अमित यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि मनाची घालमेल ते लपवू शकले नाहीत. अमित हे कसलेले राजकारणी नाहीत. अजूनही त्यांच्याकडे ती संवेदनशीलता आहे.
अशीच संवेदनशीलता जर इतर राजकीय नेत्यांकडे आली तर..? हल्ली फोनवरून कोणाची चौकशी केली किंवा कोणाला शुभेच्छा दिल्या, अथवा कोणाचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला तर त्याचेही व्हिडीओ शूटिंग करून व्हायरल केले जाते. त्या काळात अमितने शूटिंग करू न देणे आणि संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळणे ही बाब सध्याच्या भावनाहीन राजकारणात म्हणूनच वेगळी ठरली आहे.