मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:49 PM2019-12-10T13:49:05+5:302019-12-10T13:50:03+5:30

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

When will the debt of farmers be forgiven | मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

Next

चंद्रपूर: निसर्गाच्या अवकृपेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र सदर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही किंवा सरकटक कर्ज माफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत असून कृषी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना अनुदानासंबंधात विचारण्यातच त्यांचा वेळ जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. गावपातळीवर तलाठ्यांनी तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयात सादर केल्या होत्या. यातून शासनाने दिलेली प्रतिहेक्टरी मदत थेट खात्यात जमा करण्यात आली होती. गत खरीप व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा फटका बसला होता.

यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. या शेतकऱ्यांना विविध पीकविमा कमी-अधिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाला होता. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. असे असले तरी अद्यापही काही शेतकरी वंचित आहे. अशीच स्थिती अडीच वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या संदर्भात आहे. निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

त्यामुळे पात्र असताना कर्जमाफी नेमकी अडकली कुठे असे प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान मिळतात की, तेही हवेतच विरतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून यावर्षी कर्जमाफी होईल, असा आशावाद आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: When will the debt of farmers be forgiven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.