मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना शॉक लागल्यानं १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नालासोपाऱ्यातील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:34 IST2025-07-12T10:32:32+5:302025-07-12T10:34:09+5:30
Nala Sopara Class 10 student electrocuted: नालासोपारा येथील एका गृहनिर्माण सोसायटीत बॅडमिंटन खेळत असताना शॉक लागल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना शॉक लागल्यानं १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नालासोपाऱ्यातील घटना!
मुंबईजवळील नालासोपारा येथील एका गृहनिर्माण सोसायटीत बॅडमिंटन खेळत असताना शॉक लागल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश संतोष साहू असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी संध्याकाळी ७.०० वाजताच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत असताना त्यांचा शटलकॉक इमारतीच्या खिडकीवर अडकला. शटलकॉक काढण्यासाठी आकाश खिडकीवर चढला आणि तो जिवंत वायरच्या संपर्कात आला. सुरुवातीला त्याच्या आकाशला नेमके काय झाले, हे समजले नाही. परंतु, आकाशच्या मित्राने त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही शॉक लागला. सुदैवाने, तो थोडक्यात बचावला. यानंतर आकाश जमीनीवर कोसळला.
सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भयानक क्षण कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे गृहनिर्माण सोसायटीतील विद्युत सुरक्षा मानकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कळवा: स्ट्रीट लाईटचा शॉक लागून ८ वर्षांचा मुलगा जखमी
ठाण्यातील कळवा येथील पारसिक नगर भागात शुक्रवारी रात्री स्ट्रीट लाईटचा शॉक लागून एका आठ वर्षांच्या मुलाला दुखापत झाली, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचा वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा खंडित केला. या घटनेत मुलाच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आणि त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.