काँग्रेसची 'नो कॉम्प्रमाईज'ची भूमिका, वडेट्टीवार म्हणाले, 'महायुती सोबत नकोच'; वंचित-बसपाशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:54 IST2025-11-12T13:50:55+5:302025-11-12T13:54:02+5:30
आगमी निवडणुकांमध्ये काँग्रेस महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाशी युती करणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसची 'नो कॉम्प्रमाईज'ची भूमिका, वडेट्टीवार म्हणाले, 'महायुती सोबत नकोच'; वंचित-बसपाशी चर्चा करणार
Vijay Wadettiwar: राज्यातील आगामी नगरपरिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना थेट महायुतीला लक्ष्य केले आहे. वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले की, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यास तयार आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीमधील घटक पक्षांशी स्थानिक पातळीवरही युती करणार नाही.
काँग्रेसचा महायुतीसोबत युती करण्यास नकार
मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि उमेदवारांच्या निवडीवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीआधी वडेट्टीवार यांनी पक्षाचा निवडणूक अजेंडा स्पष्ट केला. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसने महायुतीसोबत युती न करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेलाही सोबत घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीसोबत एकत्रितपणे लढण्याची तयारी दर्शवतानाच, काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानुसार, काँग्रेस स्थानिक स्तरावर काही जिल्ह्यांमध्ये अन्य पक्षांसोबत हातमिळवणी करणार आहे. काँग्रेसकडून काही जिल्ह्यांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच काँग्रेस स्थानिक गरजेनुसार बसपाशी देखील आघाडी करण्याची तयारी दर्शवत आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"आज पक्षाच्या पार्लमेंट बोर्डाची बैठक आहे. राज्यात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुका होत आहेत. याबाबत तिकीट, उमेदवार अंतिम करण्यासाठी आज बैठक आहे. राज्यात महायुती मधील कोणत्याही घटक पक्षाशी आम्ही युती करणार नाही. काही जिल्ह्यात वंचित बरोबर देखील आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बीएसपी बरोबर देखील जाण्याची तयारी आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू," असं वडेट्टीवार म्हणाले.
ठाकरे-पवार गटाच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या अन्य घटक पक्षांवर दबाव वाढला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचे काही स्थानिक नेते, महायुतीमधील काही पक्षांसोबत स्थानिक पातळीवर युती करण्याची शक्यता वर्तवत होते. मात्र, काँग्रेसने महायुतीसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे, महाविकास आघाडीतील उर्वरित दोन घटक पक्षांना त्यांच्या संभाव्य युत्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.