Vidhan Sabha 2019: The reputation of the five former CMs will take a while | Vidhan Sabha 2019: पाच माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला

Vidhan Sabha 2019: पाच माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला

- पोपट पवार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि नारायण राणे या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे वारसदार नशीब अजमावणार असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी या माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर दुसरीकडे अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही विधानसभेच्या आखाड्यात उतरले असल्याने त्यांच्या मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष असणार आहे.

निलंगा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव पाटील-निलंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना भाजपकडून मंत्री, पुतणे संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. गत निवडणुकीत संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आजोबा शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्याबरोबरच मुलाला निवडून आणण्यासाठी शिवाजीराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सोलापूर मध्य मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवित उमेदवारी दिली आहे. लोकसभेला सलग दोनवेळा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याने सोलापुरातील काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिंदे यांना कन्येच्या विजयासाठी ‘मध्य’मधील प्रत्येक वॉर्डाची पायधूळ झाडावी लागणार आहे. गत निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीमुळे प्रणिती शिंदे यांना विजयासाठी झगडावे लागले होते. यंदाही या मतदारसंघात एमआयएमसोबत माकप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचे तगडे आव्हान प्रणिती यांच्यासमोर असणार आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळी नीतेश यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विधानसभा गाठली होती. तर गत निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून स्वत: राणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या काही वर्षांपासून तळकोकणातील राणे यांच्या राजकीय साम्राज्याला शिवसेनेने सतत हादरे दिले आहेत. त्यामुळे कणकवली मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष आहे.

अशोकराव, पृथ्वीराजबाबा रिंगणात...
काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भोकरमधून (नांदेड) उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून गत निवडणुकीत अशोकरावांच्या पत्नी अमिता चव्हाण निवडून आल्या होत्या. लोकसभेला पराभव पदरी पडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी विधानसभेचा मार्ग पत्करला आहे. तर दुसरीकडे कºहाड दक्षिणमधून आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vidhan Sabha 2019: The reputation of the five former CMs will take a while

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.