Toll Free For Ganpati Festival 2022: गणेशोत्सव काळात टोलमाफी! शिंदे सरकारकडून आदेश जारी, कसा मिळविणार पास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:01 IST2022-08-26T15:55:36+5:302022-08-26T16:01:13+5:30
Toll Free For Ganpati Festival 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै, २०२२ रोजी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती.

Toll Free For Ganpati Festival 2022: गणेशोत्सव काळात टोलमाफी! शिंदे सरकारकडून आदेश जारी, कसा मिळविणार पास...
राज्यातील सत्तासंघर्षानंतर पंढरीच्या वारकऱ्यांना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी घोषित केली होती. त्यावेळीच त्यांनी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. आज त्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गणेश चतुर्थी आठवड्याच्या मध्येच येत असल्याने आज, शुक्रवारपासूनच गणेशभक्त गावी जाण्यासाठी निघणार होते. परंतू, टोलमाफीचे पास मिळत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. अखेर हे आदेश निघाले आहेत.
गणपतीक कोकणात जातास? करुळ, फोंडा की आंबोली; कोणता घाट रस्ता चांगला, एकदा बघाच...
गणपती कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने शिंदेंच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै, २०२२ रोजी बैठक झाली होती. यानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सवलत देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी पास लागणार आहेत.
कशी घ्यावी टोल माफी...
“गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन" असे पास वाहनांवर लावण्यात यावेत. त्यावर गाडीचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून दिला जाणार आहे. याचा नमुना देखील राज्यातील पोलीस ठाणे, आरटीओ, वाहतुक विभागांना देण्यात आला आहे. परिवहन विभाग, वाहतूक - पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये हे पास दिले जाणार आहेत. परतीच्या प्रवासाकरीता हेच पास ग्राह्य धरण्यात येणार असल्याने ते जपून ठेवावे लागणार आहेत.
कुठे कुठे मिळतील...
ग्रामीण वा शहरी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे हे पास मिळणार आहेत. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०८२६१३५८४०८४१८ असा आहे.