पारदर्शक अन् गतिशील कारभार करावा लागेल; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली सरकारची दिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:35 IST2024-12-10T06:34:36+5:302024-12-10T06:35:23+5:30
महाराष्ट्र हे अमर्यादित ताकदीचे राज्य आहे. आपण क्रमांक एकवरच आहोत, पण म्हणून थांबता येणार नाही. जुनी पुण्याई असली, तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

पारदर्शक अन् गतिशील कारभार करावा लागेल; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली सरकारची दिशा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पारदर्शकता, गतिशीलता व लोकाभिमुखता या त्रिसूत्रीवर काम करा. जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम हाती घ्या. केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा, अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारची आगामी दिशा ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी स्पष्ट केली.
ते म्हणाले की, केंद्राकडील प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. मंत्रालयातील वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजेत, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम केंद्र व राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल.
सरकार पोर्टल पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवा. विभागांचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात प्रवास तत्काळ सुरू करावेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
‘इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या. लोक आपल्याकडे कशासाठी येतात व त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्या. त्यांचा थेट सचिवांशी संवाद व त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. प्रत्येक विभागाने १०० दिवसांचा कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
विधानसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर
nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली. ही निवड एकमताने झाली खरी, पण उद्धवसेनेच्या आमदारांनी बहिष्कार टाकला.
nमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी घोषित केले. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले.
सरकारने सहज जिंकला विश्वासदर्शक ठराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला. विधानसभा निवडणुकीत मुहायुतीने २८८ पैकी २३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मांडून तो जिंकण्याची केवळ औपचारिकता शिल्लक होती.
विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर शिंदेसेनेचे उदय सामंत, भाजपचे डॉ. संजय कुटे, अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील आणि युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मांडला. त्यानंतर हा ठराव मतास टाकण्यात आला, तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो आवाजी मतदानाने मंजूर केला.
महाराष्ट्र हे अमर्यादित ताकदीचे राज्य आहे. आपण क्रमांक एकवरच आहोत, पण म्हणून थांबता येणार नाही. जुनी पुण्याई असली, तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात
सुरू होणार आहे. हे अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालेल. याबाबतची घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.