गणेशोत्सवासाठी टोलमाफी तरीही टोलचा फटका, सावंतवाडीतील प्रवाशामुळे उघडकीस आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:14 IST2025-08-28T12:10:34+5:302025-08-28T12:14:46+5:30
टोल पास दाखवून जाण्याची परवानगी मिळाली, मात्र काही अंतर गेल्यानंतर बँक खात्यातून पैसे वळवले

गणेशोत्सवासाठी टोलमाफी तरीही टोलचा फटका, सावंतवाडीतील प्रवाशामुळे उघडकीस आला प्रकार
अनंत जाधव
सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने टोलमाफी दिली आहे. मात्र, टोलमाफीचा परवाना असूनही बँक खात्यातील रक्कम टोलसाठी घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धानोरी (जि. पुणे) येथील मनोहर पवार हे पुण्याहून सावंतवाडीकडे प्रवास करत होते. त्यांना टोलमाफीचा परवाना पुणे पोलिस ठाण्यातून देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या बँक खात्यातील रक्कम टोलसाठी वळविण्यात आली आहे.
पवार यांना विश्रांतवाडी पोलिस चौकीतून पथकर माफीचा पास देण्यात आला होता. हा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली गेली होती. त्यावेळी तपशीलवार नोंद घेण्यात आली होती. परंतु, हा परवाना घेऊन पवार सावंतवाडीकडे प्रवास करत असताना टोलनाक्यावर त्यांना टोल पास दाखवून जाण्याची परवानगी मिळाली, मात्र त्यांची कार टोलनाका ओलांडून काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे वळवले गेले.
हा प्रकार पुणे येथील खेड शिवापूर टोलनाका, आणेवाडी टोलनाका व तासवडे टोलनाक्यावर घडला. मनोहर पवार यांच्या खात्यावरील तब्बल २८५ रुपये वळविण्यात आले आहेत. गणेश चतुर्थींनिमित्त कोकणवासीयांना आनंदी करण्यासाठी राज्य सरकार विविध घोषणा केल्या आहेत मात्र त्यातील अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या आहेत.या प्रवाशांची टोलसाठी घेतलेली रक्कम सरकारने परत द्यावी, अशी मागणी होत आहे.