मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:24 IST2026-01-03T06:23:04+5:302026-01-03T06:24:05+5:30
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राज्यभरात हायव्होल्टेज ड्रामा;

मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
मुंबई : महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. भाजपसह सर्वच पक्षांमधील बंडखोरांची मनधरणी करता करता वरिष्ठ नेत्यांच्या नाकीनऊ आले. काही ठिकाणी त्यांना यशही आले; पण तरीही ठाम असलेल्या बंडखोरांचा सर्वच पक्षांना फटका बसणार, असे चित्र आहे. राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये कुठे चौरंगी, तर कुठे बहुरंगी लढती होणार हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या वादात सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली, तर धुळ्यात गोळीबाराची घटना घडली.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिवसभर प्रचंड कसरत करत बंडखोरांना अनेक ठिकाणी माघार घ्यायला लावण्यात यश मिळविले. राज्याच्या १० महापालिकांत तब्बल ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यात भाजपचे सर्वाधिक ४४ नगरसेवक आहेत.
मुख्यमंत्र्यांचा फोन अन् बंडखोराची माघार
मुंबईत शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे महामंत्री व दादरमधील बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. तुमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर धुमाळे यांनी माघार घेतली.
महामुंबईत ४० बिनविरोध
महामुंबईत भाजप व शिंदेसेनेचे किमान ४० उमेदवार बिनविरोध निवडून आले. हा एक नवा विक्रम आहे. ठाण्यात शिंदेसेनेचे ७, कल्याण-डोंबिवलीत भाजपचे १४, तर शिंदेसेनेचे सहा तसेच भिवंडीत भाजपचे सहा, तर पनवेलमध्ये भाजपचे सहा तर एक अपक्ष असे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी समर्थकांनीच कोंडले !
माघार घेऊ नये यासाठी नाशिकमधील एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी अजब शक्कल लढवली. त्यांनी उमेदवारालाच चक्क एका खोलीत कोंडले. माघारीची मुदत संपल्यानंतरच त्याला बाहेर काढले. अर्थात, यानंतर त्यांनी स्वत: अन्य अपक्षांशी तडजोड करून माघार घेतली खरी, परंतु पत्नीचा अर्ज मात्र कायम ठेवला.
पंचवटी विभागातील भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड तसेच त्यांची पत्नी सुनीता यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला फोन स्वीच ऑफ ठेवल्याने त्यांच्या नातेवाईकांना माघार घेण्यास सांगा, असे निरोप सुरू झाले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना घरातच कोंडून बाहेर स्वत:च जागता पहारा ठेवला.
याशिवाय नाशिकमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाठ आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसेच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात सिडको मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातच आधी शिवीगाळ आणि नंतर फ्री स्टाइल हाणामारी देखील झाली.
१० महापालिकांमध्ये ६६ नगरसेवक बिनविरोध
भाजप ४३
शिंदेसेना १९
राष्ट्रवादी (अजित पवार) २
इस्लामिक पार्टी १
अपक्ष १
राजकीय नाट्याने रंगला माघारीचा अंतिम दिवस
अहिल्यानगरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादीचे (अजित पवार) दोन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर शुक्रवारी भाजपचेही तीन उमेदवार बिनविरोध करत मित्रपक्षापेक्षा एक पाऊल पुढे टाकले. शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) व आम आदमी पक्षातील उमेदवारांनी त्यांच्याच पक्षाला चुना लावल्याने हे तिघे बिनविरोध झाले. माघारीचा अंतिम दिवस मात्र आक्षेप व राजकीय नाट्याने चांगलाच रंगला.
भाजप बंडखोराला नागपुरात कोंडले
नागपुरात भाजपचे बंडखोर किसन गावंडे यांनी माघार घेऊ नये म्हणून समर्थकांनी त्यांना कोंडून ठेवले, तीन तास हे नाट्य चालले. आमदार परिणय फुके यांच्या पुढाकाराने अखेर गावंडे यांनी माघार घेतली. पक्षादेश आमच्यासाठी सर्वतोपरी असल्याचे गावंडे म्हणाले.