कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:41 IST2025-12-31T09:39:59+5:302025-12-31T09:41:11+5:30
एबी फॉर्मचा 'क्लायमॅक्स' : नेत्यांच्या गाड्यांचा फिल्मी पाठलाग आणि कार्यालयांची झाली तोडफोड; आमच्यासाठी वरिष्ठांशी भांडण करा, पण आम्हाला न्याय द्या; उमेदवारी नाकारल्यामुळे राज्यभरातील इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...

कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. ठाण्यात तिकीट नाकारल्याने भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. नाशिकमध्ये शहराध्यक्षांच्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत तिकिटांच्या विक्रीचा गंभीर फार्महाऊसवर राडा करण्यात आला. येथे आरोप झाला.
जळगावमध्ये उमेदवारी मिळाल्याने इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाने आमदारांना रडत घेराव घातला, तर सोलापूर आणि चंद्रपुरात फॉर्म सादर करण्यावरून नेत्यांमध्ये खटके उडाले. कोल्हापुरात निष्ठा बदलत अनेकांनी मिळेल त्या पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे. 'बाहेरच्यांना' संधी आणि निष्ठावंतांना डावलल्याच्या भावनेतून कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांविरुद्धच बंडाचे निशाण फडकवल्याने सर्वच पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे.
तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी पक्षाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षांसमोर आव्हान आहे.
उमेदवारी नाकारल्याने आमदारांना घेराव; कुटुंबाने फोडला टाहो
जळगाव : भाजपने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला. यावेळी पाटील कुटुंबाला रडू कोसळले, तर प्रश्नांच्या सरबत्तीमुळे आमदार भोळे हतबल झाले.
प्रभाग क्रमांक १ मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह कुटुंबाने थेट आमदार सुरेश भोळे यांना जाब विचारला. तुम्ही आमच्यासाठी वरिष्ठांशी का बोलत नाही? आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण करा, पण आम्हाला न्याय द्या,' अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
भाजप कार्यालयात तोडफोड, काँग्रेसमध्ये झाली धक्काबुक्की
ठाणे : एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच ठाण्यातील भाजप, शिंदेसेना व काँग्रेस या पक्षांत तीव्र असंतोष उफाळून आला. बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली.
तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना २ तिकीट देतात, असा आरोपही केला. ठाण्यातील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू असताना, सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच शिवीगाळ, धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. नाराज इच्छुकांची समजूत काढताना तारांबळ उडाली होती.
आमदारांच्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग, तिकीट विक्रीचा आरोप
नाशिक : भाजपचा एबी फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांनी थेट शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याच गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाइलने पाठलाग केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी केदार यांच्यासोबत गाडीत आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे याही होत्या.
संतप्त इच्छुकांनी गेट फोडून फार्महाऊसमध्ये प्रवेश केला. गोंधळ अधिक वाढू लागल्याने सुनील केदार गाडीतून निघाले. यामुळे इच्छुकांच्या संतापात भर पडली. काही संतप्त इच्छुकांनी केदार यांच्या गाडीचा पाठलाग केला. यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन तिकिटे सर्रास विकली गेल्याचा आरोप केला. यामुळे तणाव वाढला.
पक्षनिरीक्षकांसमोरच उमेदवारीवरून गोंधळ, अपक्ष अर्ज अन् बंड
चंद्रपूर : महापालिकेची उमेदवारी देण्यावरून 'भाजप'चे पक्षनिरीक्षक आमदार चैनसुख संचेती यांच्यासमोरच पक्षातील इच्छुकांनी जोरदार गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये घडला. आमदार किशोर जोरगेवारांनी समजूत घालूनही अनेकांनी अपक्ष नामांकन दाखल करून पक्षाविरुद्ध बंड पुकारले. काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या दिग्गज समर्थकांचे तिकीट कापून वर्चस्व प्रस्थापित केले. नामांकन मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काँग्रेस व भाजपमध्ये अंतर्गत पाडापाडीच्या धक्कादायक घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.
बैठकीत धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात खटके
उमेदवारीचे सर्व निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्याची सूचना काँग्रेसच्या हायकमांडने दिली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात खटके उडाले. याची चर्चा शहरात दिवसभर होती.