४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:46 IST2026-01-01T11:43:52+5:302026-01-01T11:46:05+5:30
Municipal Election 2026 News: शिवसेना ठाकरे गट सोडताना मनाला वेदना होत आहेत. परंतु, परिसराच्या विकासासाठी भाजपामध्ये जाण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे.

४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
Municipal Election 2026 News: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. अर्ज भरण्याच्या दिवशीही अनेकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत महापालिकेचे तिकीट मिळवले. अनेक निष्ठावंतांना तिकीट नाकारले गेल्याने तीव्र संताप, नाराजी व्यक्त करण्यात आली. यातच ४० वर्ष ठाकरेंसोबत राहिलेल्या एका नेत्याने पक्षाकडून एबी फॉर्मही मिळवला. परंतु, ऐन वेळेस भाजपामध्ये प्रवेश करून अर्ज दाखल केला.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला असून, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी संपूर्ण परिवारासह भाजपात प्रवेश केला आहे. वानकर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक विनोद भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला सोलापुरात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
४० वर्षे निष्ठावंत, चार एबी फॉर्म दिले अन् एका दिवसात पक्ष सोडला
प्रभाग क्रमांक ६ मधून गणेश वानकर आणि संपूर्ण पॅनलने उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर एबी फॉर्म घेतले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी गणेश वानकर यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारांना एबी फॉर्म दिले. यानंतर लगेचच अवघ्या एका दिवसात गणेश वानकर यांनी मशालीचे फॉर्म बाजूला ठेवत थेट कमळ चिन्हावर भाजपाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. गणेश वानकर मागील ४० वर्षांपासून ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान मानला जात होते. गणेश वानकर यांचा अचानक झालेला भाजपा प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, उद्धवसेना सोडताना मनात वेदना असल्याची भावना गणेश वानकर यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना मनात शल्य आहे. मात्र सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक भाजपाकडून लढवणार आहे, असे वानकर यांनी म्हटले आहे.