बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 07:14 IST2026-01-03T07:11:58+5:302026-01-03T07:14:15+5:30
...त्यामुळे एकीकडे बिनविरोध विजयाचे हसू अन बंडखोरीचे आसू सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहेत.

बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
ठाणे : महापालिकांच्या निवडणुकीतील अर्ज माघारीनंतरच्या बंडखोरीचे नेमके चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. एकीकडे सत्ताधारी भाजप, शिंदेसेनेला ठाणे व रायगड जिल्ह्यात ४० उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात यश आले, तर दुसरीकडे प्रत्येक महापालिकेत मोजकेच बंडखोर हे याच सत्ताधारी पक्षांशी संबंधित असून, तेच परस्परांची डोकेदुखी वाढवणार, असे संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे एकीकडे बिनविरोध विजयाचे हसू अन बंडखोरीचे आसू सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहेत.
ठाण्यात किरण नाकती (अपक्ष - प्रभाग क्रमांक २१ ड- बंडखोर शिंदेसेना), प्रमिला केणी (अपक्ष - प्रभाग क्रमांक २३ ब - बंडखोर शिंदेसेना), महेश कदम (उद्धवसेना- प्रभाग क्रमांक १२ ड - बंडखोर भाजप), रागिणी बैरीशेट्टी (अपक्ष - प्रभाग क्रमांक ५ क - बंडखोर भाजप), रवी घरत - प्रभाग १ - ड, (शिंदेसेना बंडखोर), प्रवीण नागरे - प्रभाग -२ ड (शिंदेसेना बंडखोर), सुषमा दळवी (प्रभाग - ३ अ - भाजप बंडखोर), दत्ता घाडगे (प्रभाग - ३ क भाजप बंडखोर), भूषण भोईर प्रभाग - ३ ड -(ठाणे शहर विकास आघाडी - बंडखोर शिंदेसेना), लॉरेन्स डिसोझा - प्रभाग - ८ ड - (भाजप बंडखोर) या बंडखोरांची डोकेदुखी कायम आहे. ठाण्यात स्नेहा पाटील (भाजप बंडखोर प्रभाग - ३ - ब), निशा पाटील (शिंदेसेना - प्रभाग - ८ - ब), सुलोचना पाटील (राष्ट्रवादी शरद पवार - अपक्ष - २९ - अ), श्रीरंग कुडूक (राष्ट्रवादी अजित पवार ०९ ड), दीपा गावंड (बंडखोर भाजप - २३ ब) यांनी माघार घेतल्याने अधिकृत उमेदवारांना दिलासा लाभला आहे.
शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या माघारीमुळे दिलासा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ७ मधून शिंदेसेनेचे मोहन उगले यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी विजया पोटे यांना उमेदवारी दिल्याने उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याने उगले यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. शिंदेसेनेच्या रजनी मिरकुटे यांनी माघार घेतली.
शिंदेसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांची बहीण प्रमिला पाटील यांच्या विरोधात भाजपच्या साधना गायकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तो त्यांनी मागे घेतलेला नाही. संताेष केणे यांचा मुलगा प्रणव यांनी माघार घेतली. शिंदेसेनेच्या प्रेमा म्हात्रे यांनीही माघार घेतली.
कल्याण पूर्वेतील शिंदेसेनेच्या सुशिला माळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला हाेता. त्यांनी माघार घेतली. शिंदेसेनेचे बंडखाेर उमेदवार मोहन उगले हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी २ वाजता क प्रभाग कार्यालयात पाेहचले. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांपैकी एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केली, तेव्हा त्याठिकाणी जोरदार बाचाबाची झाली. येथे एकूण ८४६ अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झाले हाेते. उमेदवारी अर्ज छाननी पश्चात ६९५ वैध ठरले. निवडणुकीच्या रिंगणातून २०५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. रिंगणात ४९० उमेदवार आहेत.
बंडखोरीची शिंदेसेना, भाजपला डोकेदुखी कायम
उल्हासनगर : राष्ट्रवादी (अजित पवार)च्या पाच जणांसह १८९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने, ४३२ उमेदवार रिंगणात राहिले. शिंदेसेनेच्या ज्योती माने, समिधा कोरडे, जयश्री सुर्वे, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांची पत्नी यांची बंडखोरी कायम आहे. शिंदेसेनेच्या मनिषा भानुशाली, स्मिता चिखलकर यांनी अर्ज मागे घेतला. भाजपचे प्रकाश नाथानी, राजेश टेकचंदानी, नीलेश बोबडे यांनी बंड कायम ठेवले. प्रभाग १ उद्धवसेनेच्या भारती वाघे, प्रभाग १० मध्ये दीपा साळवे, ओमी टीम समर्थक दिपू निषाद, प्रभाग १६ मधून मनिषा भोसले, रोशन चैनानी, प्रभाग १७ मधून बंटी चांदवानी, विजय गेमनानी यांनी अर्ज मागे घेतले.
बिनविरोधचा दिलासा आणि बंडखोरीचा चटका
पनवेल : पनवेलमध्ये १,१३३ अर्जांची विक्री झाली. ३९१ अर्ज भरले गेले. ४८ अर्ज छाननीत बाद ठरले. ८८ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी २५५ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील आणि माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी बंडखोरी कायम ठेवली. सुनील गोवारी यांनी शिंदे सेनेतून बंडखोरी करून उद्धवसेनेमधून उमेदवारी दाखल केली. पनवेलमध्ये बिनविरोध निवड झालेल्या सात उमेदवारांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले. आता येथे प्रचाराला जोर येणार आहे.
बिनविरोध निवडीने भाजपला दिलासा
भिवंडी : ९० जागांपैकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ८४ जागांसाठी तब्बल ६३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३२३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. या निवडणुकीसाठी १०३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९८ अर्ज बाद झाले होते. उर्वरित ९५६ उमेदवारांपैकी ३२३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ६३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खरी लढत भाजप-शिंदेसेना युतीशी काँग्रेस व समाजवादी पार्टीची असणार आहे. सपा व काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे.
वसई-विरारमध्ये २८६ बंडोबा झाले थंडोबा
वसई : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी दाखल ९३५ उमेदवारी अर्जांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत छाननी झाली. या छाननीत नऊ प्रभागांतून ९२ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर ८३३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. गुरुवारी दिवसभर अनेक बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न त्या त्या पक्षांकडून केले. कुणाला फोन केले, तर कोणाला भेटीसाठी स्थानिक नेत्यांकडून बोलावले जात होते. शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ८३३ पैकी २८६ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता वसई-विरार पालिकेसाठी ५४७ उमेदवार रिंगणात आहेत.
नवी मुंबईत भाजपच्या ३६ बंडखोरांची माघार
नवी मुंबई : नवी मुंबईत २९१७ अर्जांची विक्री झाली. ९५६ अर्ज भरले गेले. छाननीत ११७ अर्ज अवैध ठरले व ८३९ अर्ज वैध ठरले. २६९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता रिंगणात ४९९ उमेदवार आहेत. माघार घेणाऱ्या भाजप उमेदवारांमध्ये अनिल कौशिक, शार्दुल कौशिक, राजू शिंदे, माधवी शिंदे, स्नेहा पालकर यांचा समावेश आहे. बेलापूरमध्ये माजी शहराध्यक्ष सी. व्ही. रेड्डी आणि नेरूळमध्ये पांडुरंग आमले यांनी मात्र बंडखोरी कायम ठेवली. शिंदेसेनेच्या प्रल्हाद पाटील, शुभांगी मिलिंद सूर्याराव, राणी कांबळे या बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. आता येथे प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.
मिरा-भाईंदरमध्ये ११३ जणांची माघार
मिरा रोड : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत ५४८ उमेदवारांपैकी ११३ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात आहेत. पक्षनिहाय संख्या पाहता भाजपचे सर्वाधिक ८७ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेनेचे ८१ तर उद्धवसेनेचे ५६ उमेदवार लढत आहेत. मनसेचे ११, काँग्रेसचे ३२ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार)ने ३३ उमेदवार उभे केले असून राष्ट्रवादी (शरद पवार)ने १४ उमेदवार उभे केले आहेत. या शिवाय वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम, आरपीआय आदी पक्षांसह अपक्षांची संख्या पण मोठी आहे.