शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:46 IST2025-12-29T08:44:15+5:302025-12-29T08:46:28+5:30
Shiv Sena Shinde Group News: मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात आलेल्या प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
Shiv Sena Shinde Group News: दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. प्रकाश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
राज्यभरात २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि राज्यभरात अनेक ठिकाणी मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा आणि नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकीची लय कायम ठेवण्यावर शिवसेना शिंदे गटाचा भर असणार आहे. शिवसेना शिंदे गटातील इन्कमिंगही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात आलेल्या प्रकाश महाजन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी प्रकाश महाजन यांची नियुक्ती
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे, असे पत्र देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदेंचे अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही
अडीच वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेले काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. हिंदुत्वाविषयी जागरुक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असेही प्रकाश महाजन यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटले होते.
दरम्यान, मनसेमध्ये सक्रिय असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यमावर जाहीर केले होते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे, यासाठी आपण पक्षात होतो, असे प्रकाश महाजन त्यावेळी म्हणाले होते.