"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:38 IST2024-10-31T17:36:33+5:302024-10-31T17:38:07+5:30
विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शिवाजीराव देशमुख यांच्यावरून शरद पवारांवर टीका केली.

"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
Sadabhau Khot Sharad Pawar: महायुतीचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. शिराळा येथील प्रचार सभेत बोलताना माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना गद्दार म्हटले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "मी ज्या सभागृहात काम करतो, त्या सभागृहाचे सभापती होते, शिवाजीराव देशमुख. ते आजारी होते. घरात मशीन बसवल्या होत्या. रक्त बदलावं लागत होतं. रक्त बदलल्यावर ते उठून कामाला लागायचे. ते सभापती होते. त्यांच्यावर तुम्ही (शरद पवार) कठीण काळात अविश्वास ठराव आणला."
"शिवाजीराव देशमुखांवर तुम्ही अविश्वासाचा ठराव आणला"
"देशमुख साहेब काय म्हणत होते की, मी आजारी आहे. मी स्वतःहून राजीनामा देतो. माझा तुम्ही अपमान करू नका. मला काही नकोय. थोडं मला बरं होऊ द्या. मी चालत त्या सभागृहाच्या दरवाजात येतो आणि राजीनामा देतो. अरे तुम्ही (शरद पवार) त्या माणसावर अविश्वासाचा ठराव आणला. पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे", अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत पुढे बोलताना म्हणाले की, "या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदारसंघातील जनता या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही."