‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 22:47 IST2025-09-19T22:42:10+5:302025-09-19T22:47:54+5:30

Maharashtra State Election Commission on Rahul Gandhi Allegations: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

rahul gandhi made public allegations on rajura maharashtra vote chori now the state election commission has brought the truth to the fore with provided evidence | ‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Maharashtra State Election Commission on Rahul Gandhi Allegations: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे मत चोरणाऱ्यांना पाठीशी घालत असून लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रातीलराजुरा मतदारसंघात ६,८५० जणांची नावे फसव्या पद्धतीने ऑटोमेटेड सॉफ्टवेअरद्वारे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. यावर आता राज्य निवडणूक आयोगाने पत्रक प्रसिद्ध करत पुरावा देत सत्य समोर आणले.

प्रशासनाने स्वतःहून व वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेली, या मथळ्याखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची दखल घेत याबाबतची सविस्तर माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली आहे. 

एकूण ७,५९२ नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले

राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी प्रकरणाबाबत वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, कार्यालय चंद्रपूर यांनी पुढील बाबी निदर्शनास आणल्या आहेत.  राजूरा विधानसभा मतदारसंघाचे, मतदार नारेंदणी कार्यालयात दि. ०१ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण ७,५९२ नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) सदर अर्जाची तपासणी करण्यात आली असता त्यांना अर्जामध्ये खालील त्रुटी निदर्शनास आल्याः

१. अर्जदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसणे,
२. अर्जदार अस्तित्वात नसणे,
३. आवश्यक छायाचित्रे व पुरावे जोडलेले नसणे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीअंती सदर ७,५९२ अर्जापैकी ६,८६१ अर्ज अवैध ठरविण्यात आले. या अर्जाची मतदार यादीत नोंद करण्यात आलेली नाही. 

पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे

सदर प्रकरणाची जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी त्याच वेळेस गंभीर दखल घेऊन मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना सर्वच अर्जांची सखोल चौकशी करण्याचे व लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर निर्देशांच्या अनुषंगाने राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क.६२९/२०२४ नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे.

बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आले

मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाव्दारे स्वतःहून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे ६,८६१ बनावट अर्ज रद्द होऊन सदर नावांचा ७०, राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समावेश होवू शकलेला नाही. मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजुरा यांनी दक्षता व वेळेवर घेतलेल्या तात्काळ कारवाईमुळे ७० राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आले आहेत.

दरम्यान,  राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० नव्या मतदारांची संशयास्पद नोंदणी झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरातील या प्रकरणाकडे लक्ष वेधले. या नोंदणी विरोधात गुन्हाही दाखल आहे. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत कोरपनाचे काँग्रेसचे नेते विजय बावणे यांनी मतदार याद्या तपासल्या असता अनेक नावे चुकीच्या पत्त्यांसह, बोगस मोबाइल क्रमांकांसह व भिंतीचे फोटो लावलेली आढळली. ही नावे प्रामुख्याने परप्रांतीय नागरिकांची आहेत.

Web Title: rahul gandhi made public allegations on rajura maharashtra vote chori now the state election commission has brought the truth to the fore with provided evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.