आंबेडकर यांचा फंडा; गर्दुल्यांना द्या तो पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:45 IST2026-01-12T08:45:19+5:302026-01-12T08:45:19+5:30
पैस वाटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी एक नवीनच फंडा सांगितला

आंबेडकर यांचा फंडा; गर्दुल्यांना द्या तो पैसा
महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक नवीनच फंडा सांगितला आहे. तुमच्या वस्तीत १२, १३ आणि १४ जानेवारीला पैसा वाटायला लोक येतील तेव्हा तुम्ही एकच करा. तुमच्या परिसरात एखादा गर्दुल्ला असेल तर त्याला घेऊन जा आणि गाडीतले पैसे पळवून घेऊन जायला सांगा. त्याची वर्षभराची सोय होईल. निवडणुकीत वाटण्यासाठी आलेला पैसा हा काही कष्टाने कमावलेला नसतो, त्यामुळे हा पैसा कोणी पळविलाही तरी त्याची पोलिसांत तक्रार होत नाही आणि समजा झालीच तर मग पोलिस ज्याचा पैसा पळवला गेला त्याला विचारतील की बाबा रे! हा पैसा तू आणला कोठून होता, कमावला कसा होता ते सांग ! त्यावर त्याच्याकडे उत्तर नसेल. गमतीने हे सांगताना मग आंबेडकर यांनी सभेत आवाहन केले की तुमच्या वस्तीत पैसा वाटण्याचा कोणीही प्रयत्न केला तर तो हाणून पाडा. पैसे वाटण्याचे सर्वांत जास्त प्रकार हे मतदानाच्या अदल्या रात्री होतात, यावेळी १४ जानेवारीला रात्रीबेरात्री लक्ष्मीदर्शनाची धूम असेल. पोलिस किती जणांना पकडतात ते पाहायचे !