"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:11 IST2026-01-05T15:09:27+5:302026-01-05T15:11:47+5:30
Narayan Rane Retirement Sunil Tatkare: कधीतरी थांबायला पाहिजे, असे राणे भाषणात म्हणाले

"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
Narayan Rane Retirement Sunil Tatkare: शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा अशा तीन बड्या पक्षाच्या माध्यमातून राजकारण करणारे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. सिंधुदूर्गातील एका सभेमध्ये बोलताना त्यांनी जी विधाने केली, त्यावरून नारायण राणे आता राजकारणातून संन्यास घेणार असा अंदाज लावाला जात आहे. "माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करता. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. कधीतरी थांबायला पाहिजे," असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही याबाबत आपले मत मांडले.
"नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत का दिले आहेत ते मला माहिती नाही. कदाचित नितेश आणि निलेश दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील. पण तसे अनेक कुटुंबात अनेक ठिकाणी देशभरामध्ये घडत असते. नारायण राणेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणे राज्याच्या किंवा कोकणाच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असे मला स्वतःला वाटत नाही," असे सुनील तटकरे म्हणाले.
नारायण राणे नेमके काय म्हणाले?
"आज ३६ वर्ष राजकारणात झाली. आजपर्यंत एकही कार्यकर्ता माझ्यासमोर दारू किंवा सिगारेट पिऊन आला नाही. आज पैसे देऊन लोकांना बोलवले नाही. आज आपण चर्चा केली, एकमेकांशी बोललो. तुमच्याशी बोलून ठणठणीत झालो. माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करताय. माझ्याकडे आभार मानायला शब्द नाही. मी असेपर्यंत माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. दोघेही देणाऱ्यांपैकी आहेत. आमचे दुश्मन कुणी नाही. कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रीय झाल्यानंतर आता कुणी व्यवसायही पाहायला पाहिजे," असे विधान करत नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले.