Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:27 IST2025-12-31T16:17:46+5:302025-12-31T16:27:28+5:30
Maharashtra Municipal Election Result 2026 BJP: महापालिका निवडणुकीत भाजपाची मतदानाआधीच घोडदौड सुरू झाली आहे. भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
Municipal Election 2026 Winners: राज्यात २९ महापालिकांची निवडणूक होत असून, त्यापैकी तीन महापालिकांमध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे. अर्ज छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली, पनवेल, धुळे या महापालिकांमध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे.
२९ महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला दिलासा देणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात पाच ठिकाणी भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
कल्याण डोंबिवलीत तीन महिला विजयी
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपाच्या दोन उमेदवार विजयी झाल्या आहेत. भाजपा उमेदवार रेखा चौधरी प्रभाग क्र. १८ मधून, तर प्रभाग क्र. २६-क मधून आसावरी नवरे अशी बिनविरोध विजयी झालेल्यांची नावे आहेत. आसावरी नवरे या पहिल्यांदाच नगरसेवक बनल्या आहेत, तर रेखा चौधरी या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
भाजपाच्या उमेदवार रंजना पेणकर या सुद्धा प्रभाग क्रमांक २६ ब मधून विजयी झाल्या आहेत. अर्ज छाननीमध्ये इतर अर्ज बाद झाल्याने पेणकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
रवींद्र चव्हाण म्हणाले, 'निर्णायक शुभारंभ'
"कल्याण डोंबिवलीत भाजपाचा निर्णायक शुभारंभ ! कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला. प्रभाग क्र. १८ मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्र. २६-क मधून आसावरी नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन द्वारे दोघींचे अभिनंदन केले", अशा भावना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
पनवेलमध्ये शेकाप उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपाचा उमेदवार बिनविरोध
पनवेल महानगरपालिकेत निकालाआधीच महाविकास आघाडीला झटका बसला, तर भाजपाने विजयी सुरूवात केली.
प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. प्रभागातून दोन अर्ज आलेले, त्यापैकी एक अर्ज बाद झाल्याने नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते.
धुळ्यातून दोघी विजयी, भोसले-पाटलांनी उधळला गुलाल
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उज्ज्वला रणजीत भोसले या विजयी झाल्या आहेत. अर्ज छाननीत प्रभाग १ अ मधून उमेदवार उज्ज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर होणार आहे.
उज्ज्वला भोसले या मंगळवारी (३० डिसेंबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये आल्या होत्या. त्या रणजीत राजे भोसले यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर प्रभागा क्रमांक ६ ब मधून ज्योत्सना पाटील याही विजयी झाल्या आहेत.