स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:29 IST2026-01-15T15:22:56+5:302026-01-15T15:29:16+5:30
Municipal Election News: आज सुरू असलेल्या राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान, मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
आज सुरू असलेल्या राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान, मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या बोटांवर मार्करद्वारे लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा अनेकांनी केला होता. तसेच या निवडणुकीत पहिल्यांदाच मार्करचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २०११ पासून मार्करचा वापर केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.
मतदारांच्या बोटावर लावण्यात येत असल्याची शाई पुसत असल्याचा दावा करण्यात येत असल्याच्या आणि त्यावरून होत असल्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी वाघमारे यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वापरण्यात येणारी विशिष्ट्य प्रकारची शाईच राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीत वापरण्यात आली आहे. त्यात दुसरा कुठलाही घटक मिसळलेला नाही. तसेच राज्य निवडणूक आयोग हा २०११ पासून मार्करचा वापर करत आहे. त्यामध्ये ही शाई बोटाला लावल्यानंतर सुकण्यासाठी १० ते १२ सेकंद लागतात. यादरम्यान, मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो. तसेच एकदा ही शाई वाळल्यानंतर काढता येत नाही, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी बोटावरची शाई पुसत असल्याचे करण्यात येत असलेले दावे हे फेक नरेटिव्हचा भाग असून, शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तसेच तसे व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा, निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. त्याबरोबरच मार्कबाबतचा अनुभव लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये मार्करऐवजी शाईचा वापर करण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.