शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:36 IST2026-01-15T14:36:14+5:302026-01-15T14:36:55+5:30

Marker Pen Ink Controversy at Municipal Election 2026: मतदानावेळी लावलेली शाई थोडा वेळाने पुसली जाते असा अनेकांचा आक्षेप

municipal election 2026 election commission clarification over marker pen controversy | शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Marker Pen Ink Controversy at Municipal Election 2026: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सर्वत्र मतदान सुरु आहे. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सर्व मतदार आपला हक्क बजावत आहेत. याचदरम्यान, मतदानाच्या वेळी लावण्यात आलेल्या मार्कर पेनचा मुद्दा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून मार्कर पेनद्वारे शाई लावण्याच्या गोष्टीचा कडाडून विरोध करण्यात आला आहे. तर, मार्कर पेनने शाई लावण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा असून, आक्षेप असेल तर त्याबाबत कारवाई व्हावी, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याचदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या मुद्द्यावर परिपत्रक जारी केले असून, मार्कर पेनमुळे मतदार पुन्हा मतदान करू शकणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला नाही.

निवडणूक आयोगाच्या पत्रकात लिहिले आहे की...

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.

मार्कर पेन वापराबाबत...

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन-चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Web Title: municipal election 2026 election commission clarification over marker pen controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.