"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:37 IST2026-01-12T16:35:44+5:302026-01-12T16:37:39+5:30
Municipal Election 2026: "वंचितबरोबरची आघाडी विचाराचा मेळ"

"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Municipal Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पैसा, पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर संस्कृती, संकेत व परंपरा पायदळी तुडवत लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी असून ते विरोधी पक्षांवर बुलडोझर चालवत आहेत. पण या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. म्हणूनच नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष व १००६ नगसेवक विजयी झाले. नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकातही काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते पुढे म्हणाले, "स्थानिकच्या निवडणुकीत राज्यात तीन खून झाले आहेत, हे असुरी राजकारणाचे भयावह चित्र आहे. भारतीय जनता पक्ष कोयता गँग, वरळी मटका, ड्रग्ज माफिया यांना उमेदवारी देत आहे. तुळजापूरमध्ये भाजपाने ड्रग्ज माफियाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. गुन्हेगारच नाही तर बलात्काऱ्यांनाही भाजपा संरक्षण देत आहे. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत शहरातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे पण सत्ताधारी पक्ष मात्र मराठी, हिंदी, उर्दू भाषा व महापौर कोण पाहिजे, मराठी की परप्रांतीय, यावर चर्चा केली जात आहे. सत्ताधारी पक्षाने बिनविरोधचा चालवलेला सपाटा अत्यंत चुकीचा आहे, या बिनविरोधच्या ठिकाणी नोटाचा पार्याय ठेवा व लोकशाही वाचवा."
"काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी अदानीच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे ती रास्तच आहे. काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नाही पण मोदी सरकार ज्या पद्धतीने देशातील सर्वच क्षेत्रात अदानीला मुक्तहस्ते संचार करु देत आहे, ते देशासाठी अत्यंत घातक आहे. राहुल गांधी जे सांगत आहेत तेच काल शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय संत अदानीसाठी भाजपा पखालीने पाणी घालत आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली तर ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटीश सरकारने जशी ताब्यात घेतली तसे अदानी व अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करू", असे सपकाळ म्हणाले.