देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 06:10 IST2026-01-08T06:07:31+5:302026-01-08T06:10:40+5:30
भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मागणी आहे, तर ठाकरे बंधूंच्या युतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांकरिता उमेदवार प्रयत्न करीत आहेत.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई / ठाणे : महापालिका निवडणूक प्रचाराकरिता आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच दिवस बाकी असल्याने राज्यातील नेत्यांबरोबर केंद्रीय मंत्र्यांच्या सभांची मागणी वाढली. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मागणी आहे, तर ठाकरेबंधूंच्या युतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांकरिता उमेदवार प्रयत्न करीत आहेत. शिंदेसेनेची मदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खा. मनोज तिवारी यांनाही मागणी आहे.
भाजपकडून मुंबईत प्रचारासाठी सर्वाधिक मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. त्याखालोखाल मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पसंती आहे. पश्चिम उपनगरातील अमराठी लोकवस्ती असलेल्या प्रभागात केंद्रीय मंत्री आणि परराज्यातील मुख्यमंत्र्यांना मागणी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीतील खा. मनोज तिवारी यांना अधिक मागणी आहे. मुंबईत शिंदेसेनेच्या उमेदवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराला यावे, यासाठी सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल माजी खा. राहुल शेवाळे, मंत्री उदय सामंत, दक्षिण मुंबईत संमिश्र वस्तीत खा. मिलिंद देवरा, तर पश्चिम उपनगरातील काही प्रभागात खा. रवींद्र वायकर यांना मागणी दिसते.
ठाकरे पिता-पुत्रांना मागणी
उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) युती मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढवत आहे. तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक सध्या मुंबईतील विविध प्रभागांमध्ये युतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. त्याखालोखाल आ. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या रोड शोकरिता मागणी आहे. तेजस ठाकरे यांनीही प्रचाराला यावे, यासाठीही आग्रह आहे. रश्मी उद्धव ठाकरे व तेजस ठाकरे हे उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत.
योगी आदित्यनाथ यांना मोठी मागणी
नालासोपारा/मीरारोड : वसई, विरार, नालासोपारा, नायगाव तसेच मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रात ३० ते ३५ टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. वसई - विरारमध्ये १८ उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपच्या बिहारमधील आ. मैथिली ठाकूर येणार असल्याची चर्चा आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वसईत सभा व्हावी, यासाठी उत्तर भारतीय उमेदवार आग्रही आहेत. तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी रवी किशन हेही येणार आहेत.
खा. संजय राऊत, चित्रा वाघ, सुषमा अंधारे यांच्यासाठी आग्रह
ठाणे : ठाण्यात भाजपच्या उमेदवारांकडून मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभांना मागणी आहे. चित्रा वाघ यांच्या सभांची मागणी मुख्यत्वे महिला उमेदवार करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभांची मागणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी केली आहे. मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरे यांना प्रचाराला येण्याची गळ घातली आहे. उद्धवसेनेच्या उमेदवारांना उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच खा. संजय राऊत व सुषमा अंधारे यांनी सभेला यावे, असे वाटते.
भाजपचा चव्हाण, तर शिंदेसेनेचा खा. शिंदे लढवणार किल्ला
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेचा चेहरा शिंदे पिता-पुत्र असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप उमेदवारांकडून मागणी आहे. ठाकरेबंधूंच्या युतीचे उमेदवार राज ठाकरे यांच्या सभांकरिता वाट पाहात आहेत. खा. श्रीकांत शिंदे हेच या महापालिकेकरिता सर्वाधिक सभा घेतील, अशी अटकळ आहे.
आ. गोपीचंद पडळकर, आ. भास्कर जाधव यांना मागणी
नवी मुंबई : भाजप उमेदवारांकडून मुख्यमंत्री फडणवीस, शिवेंद्रराजे, मंत्री गणेश नाईक, आ. गोपीचंद पडळकर यांच्या सभांना मागणी आहे. शिंदेसेनेचा प्रचार एकनाथ शिंदे व खा. नरेश म्हस्के हेच करतील. उद्धवसेना, मनसेच्या प्रचाराकरिता उद्धव, राज ठाकरे तसेच सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांना मागणी आहे. पनवेल महापालिकेतील उमेदवारांना मुख्यमंत्री फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभांची, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खा. सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांच्या सभांची आस आहे.