Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 23:28 IST2025-12-29T23:27:30+5:302025-12-29T23:28:49+5:30
Mira Bhayandar Municipal Corporation Election: भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांचे पुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात आली.

Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने खासदार, आमदार यांच्या नातलगांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर केल्याने मीरा भाईंदर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीच्या तोंडावर लॉन्च केलेल्या पुत्र तकशील ह्याला पालिकेची उमेदवारी देण्याच्या प्रयत्न बारगळणार असल्याची शक्यता आहे.
राजकारणातील घराणेशाहीवर सुरवातीपासून टीका करणाऱ्या भाजपातच मोठ्या प्रमाणात घराणेशाही फोफावल्याचे सातत्याने समोर येत आहे. नगरपरिषद निवडणुकीत तर भाजपाने एकाच कुटुंबातील तब्बल ६ जणांना उमेदवारी देण्याचा प्रताप केल्यावरून भाजपावर टीका होत होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपाने खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्या निर्णयाचा फटका भाजपाचे मीरा भाईंदर मधील आमदार नरेंद्र मेहता यांना बसणार आहे. मेहता यांनी त्यांच्या तकशील ह्या मोठ्या मुलास महापालिका निवडणुकी आधी लॉन्च करत थेट भाजपचे मीरा भाईंदर विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष करून टाकले. आमदार पुत्र म्हणून प्रत्येक सभा, कार्यक्रमात तकशील ह्याला भाषण करण्याची संधी पासून मनाचे स्थान दिले जात आहे.
मुलगा तकशील ह्याने संघटना बांधणीत मेहनत घेत युवकांना जोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाषण देखील तो चांगले करतोय. स्थानिक मेहता समर्थकां मध्ये त्याचे कौतुक होत आहे. आ. मेहतांनी मुलाला महापालिका निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सुरक्षित प्रभागाची तयारी केली गेल्या पासून सर्वात तरुण महापौर म्हणून बनवायचे असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. मात्र भाजपाच्या निर्णया नंतर आता आ. मेहता यांच्या पुत्रास महापालिकेचे तिकीट दिली जाणार का ? याची चर्चा रंगली आहे.
ह्या आधी मेहतांनी त्यांची भावजय डिम्पल विनोद मेहता यांना पालिका निवडणुकीत उतरवत महापौर, महिला बालकल्याण सभापती आदी महत्वाची पदे दिली होती. डिम्पल यंदा देखील मैदानात असून त्यांना उमेदवारी मिळणार अशी मिळण्याची शक्यता आहे.