ठाणे-वसईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार; ११ ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:11 IST2025-10-09T19:06:35+5:302025-10-09T19:11:02+5:30
म्हाडाच्या ठाणे आणि वसई येथील ५ हजार ३५४ घरांची लॉटरी शनिवारी काढण्यात येणार आहे.

ठाणे-वसईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार; ११ ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत!
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व वसई (पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता ११ ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल. लॉटरीसाठी १ लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले असून अनामत रकमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंकवर व म्हाडाच्या फेसबूक व यूट्यूब पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच निकाल जाणून घेता येणार आहे.
विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध होईल. विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.