साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:46 IST2026-01-02T18:33:58+5:302026-01-02T18:46:09+5:30
Marathi Sahitya Sammelan: सध्या सुरू असलेल्या महानगपालिका निवडणुकीच्या धामधुमीमुळे मंचावर आल्यापासून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने फोनवर बोलण्यात गुंतलेले दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनातील उपस्थितीपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेले फोनाफोनी ही चर्चेचा विषय ठरली होती.

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
मराठी साहित्य क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सातारा येथे सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या महानगपालिका निवडणुकीच्या धामधुमीमुळे मंचावर आल्यापासून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने फोनवर बोलण्यात गुंतलेले दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनातील उपस्थितीपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेले फोनाफोनी ही चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, या संभाषणादरम्यान, कुणाशी काय बोलणं झालं याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नंतर दिली.
साहित्य संमेलनामध्ये उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरंतर मी मंचावर बसून फोनवर कधी बोलत नाही. मात्र आज मी मोबाईल फोनवर सतत बोतल होतो. याबाबत मी इथे उपस्थित असलेल्यांची माफी मागतो. आज महानगरपालिका निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यात यावेळी सगळ्याच पक्षांमध्ये एवढी बंडखोरी झाली आहे की, मनधरणी केल्याशिवाय असे बंडखोर अर्ज मागे घेत नाही आहेत. त्यामुळे मीसुद्धा फॉर्म मागे घ्या म्हणून कार्यकर्त्यांना विनंती करत होतो. त्यामुळेच मला फोनवर बोलावं लागत होतं. कार्यक्रमादरम्यान फोनवर बोलावं लागल्याने मी तुमची क्षमा मागतो. पण असं असलं तरी मी बहुश्रूत आहे. त्यामुळे इथे काय बोललं जात होतं, त्याकडे माझं लक्ष होतं, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्यामध्ये राजकारण आणणार नाही, अशी ग्ववाहीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.