Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:33 IST2025-12-30T11:32:13+5:302025-12-30T11:33:04+5:30
Mahayuti Broken Municipal Election 2026: भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना-अजित पवार गट सरसावले, महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. जागावाटपाच्या तिढ्यावरून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे.

Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
Maharashtra Municipal Election 2026: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. जागावाटपाच्या तिढ्यावरून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या 'अहंकारा'वर प्रहार करत युती तोडल्याची घोषणा केली, तर नाशिक आणि मालेगावमध्येही मित्रपक्षांनी भाजपला 'जय महाराष्ट्र' करत स्वतंत्र किंवा नवीन युतीची चूल मांडली आहे. नवी मुंबई आणि पुण्यातही महायुती तुटली असून कुठे दोन तर कुठे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी निश्चित झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाने भाजपसोबतची युती अधिकृतपणे तोडली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री संजय शिरसाट आक्रमक झाले. "भाजपच्या अहंकारामुळेच आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. जागावाटपाबाबत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिंदे सेनेने आता स्वबळावर मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
नाशिक: नाशिकमध्ये भाजपने '१०० प्लस' जागांचा नारा देत स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर महायुतीत फूट पडली. येथे भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. या नवीन युतीमध्ये शिवसेनेकडे जास्त जागा असतील. आगामी कुंभमेळा आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नाशिकची ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
मालेगाव: मालेगाव महापालिकेतही महायुतीचे तीनही घटक पक्ष (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) स्वतंत्रपणे लढणार आहेत. भाजपने १० जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना केवळ ८ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. सन्मानजनक जागा न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी उफाळून आली आणि अखेर युती तुटल्याचे शिक्कामोर्तब झाले.
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून "सन्मानपूर्वक" जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत शिंदे-भाजपची युती तुटली असून, आता दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध शिंदे सेना अशी लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना सर्वच जागांवर एबी फ़ॉर्म वाटले गेले आहेत.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचे संकेत भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी दिले आहेत. शिवसेने ओमी कलानी साई पक्ष यांच्यासोबत युती केल्याने भाजपने तटस्थ भूमिका घेत 78 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमरावती : अमरावती मनपा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमधील युती तुटली आहे. शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपला अमान्य झाला आहे. यामुळे आता दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत.