Maharashtra Election 2019: will respond Uddhav Thackeray by taking rally in front of Matoshree says bjp leader narayan rane | Maharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'
Maharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'

सावंतवाडी: वेळ पडल्यास माझ्यावर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 24 तारखेनंतर मातोश्रीच्या समोर सभा घेऊन उत्तर देईन, असं भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे. मी शिवसेनेत असेपर्यंत उद्धव ठाकरेंनी कधीही डोकं वर काढलं नव्हतं. माझ्यात गुणवत्ता होती, म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी मला पदं दिली, असंदेखील राणे म्हणाले. ते भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवणाऱ्या नारायण राणेंनी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार असलेल्या दीपक केसरकर यांचाही समाचार घेतला. 'सिंधुदुर्ग जिल्ह्याला राजकारण नकोय. तर विकास हवाय. दहा वर्षांत दीपक केसरकर यांनी काही केलं नाही. कर्तृत्वच नसल्यानं केसरकरांनी मतं मागण्याचा अधिकार गमावला आहे. सावंतवाडीतील जनता त्यांच्या कामाबद्दल समाधानी नाही. विधानसभेत केसरकर यांना जोकर म्हणतात. त्यांना प्रश्नांची उत्तरंदेखील देता येत नाही,' अशी टीका राणेंनी केली. 

सिंधुदुर्गातलं पर्यटन वाढल्यानं माझा पराभव करण्यासाठी गोव्याचं मंत्रिमंडळ सावंतवाडीत आल्याचं केसरकर म्हणाले होते. त्यावर गोव्यात भाजपाचं सरकार असल्यानं भाजपाचे मंत्री येणार नाही, तर मग मंत्री कोणाचे येणार, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. केसरकर यांनी पर्यटनासाठी काय केलं. गोव्यात लाखो पर्यटक येतात. तसे सिंधुदुर्गात का येत नाहीत? गोव्यातील पर्यटक यायला सिंधुदुर्गात चांगले रस्ते आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

केसरकर खोटं बोलून मंत्री झाले. ते बेडकापेक्षा जास्त उड्या मारतात. भाजपात येतो असं सांगून त्यांनी मुख्यमंत्र्याकडून मंत्रीपद मिळवलं. मात्र यापुढे ते आमदारही होणार नाहीत. कारण आमदार म्हणून ते पूर्णपणे निष्क्रिय होते. त्यांना धड बोलताही येत नाही. मी केलेली कामं सांगू शकतो. तशी कामं केसरकर सांगू शकतात का, असा प्रश्न राणे यांनी विचारला. 
 


Web Title: Maharashtra Election 2019: will respond Uddhav Thackeray by taking rally in front of Matoshree says bjp leader narayan rane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.