Maharashtra Election 2019: NCP Sharad Pawar Slams BJP Goverment Of Maharashtra | Maharashtra Election 2019 : भाजपा सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही: शरद पवार
Maharashtra Election 2019 : भाजपा सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही: शरद पवार

शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य चालवण्याचा निर्णय यांनी घेतला. मात्र महाराजांचा इतिहास ज्याठिकाणी तयार झाला ते गडकिल्ले इथून पुढे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार का? तसेच ज्या महाराजांची तलवार शौर्याने तेजाने चमकली त्याठिकाणी दारूचे अड्डे काढण्याचा निकाल या सरकारने घेतल्याने यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे धरणं बांधण्यासाठी पुढाकार घेत अनेक प्रागतिक निर्णय आम्ही घेतले. रोजगार हमी कायदा १९७८ साली एकमताने झाला तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रात झाला तेव्हाही मीच मुख्यमंत्री असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यातील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.

राज्यात मंडल कमिशनच्या निर्णयावरून दंगली झाल्या. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय राबवला. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी काहींचा विरोध असतानाही आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिलं होतं. तुम्ही काय केलं? अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचं जाहीर केलं पण आजवर एका विटेचंही बांधकाम केलं नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याचं जाहीर केलं. पण घटनेच्या शिल्पकाराचं स्मारक तुम्हाला ५ वर्षांत उभारता आलं नाही आणि मला विचारतात तुम्ही काय केलं? असा प्रश्न देखील शरद पवारांनी उपस्थित केला. 

Web Title: Maharashtra Election 2019: NCP Sharad Pawar Slams BJP Goverment Of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.