महाविकास आघाडीत MIM ची होणार एन्ट्री?; जलील यांची 'इंडिया' आघाडीला थेट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:25 IST2024-08-14T15:24:24+5:302024-08-14T15:25:50+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमनं महाविकास आघाडीला थेट ऑफर देत इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत MIM ची होणार एन्ट्री?; जलील यांची 'इंडिया' आघाडीला थेट ऑफर
छत्रपती संभाजीनगर - इंडिया आघाडीसोबत जाण्याची AIMIM ची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तर इतक्या जागा आम्ही MIM ला देऊ शकतो ते सांगावे. तुम्ही उद्या मुंबईत बोलवा. महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय असदुद्दीन औवेसी यांनी माझ्यावर सोडलेले आहेत. आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू असं विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मविआ नेत्यांकडून याआधी अनेकदा एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला सोबत घेतलं तर तुमचा फायदा होईल नाही घेतले तर एमआयएममुळे फटका बसला असा आरोप करू नका. महाविकास आघाडी एमआयएमला किती जागा सोडणार हे सांगावे. आमची इंडिया आघाडीसोबत येण्याची इच्छा आहे. तुम्ही फक्त आम्हाला किती जागा देणार ते सांगा असं जलील यांनी सांगितले.
तसेच शरद पवार, काँग्रेस आणि नव्यानं सेक्युलर झालेली उद्धव ठाकरेंची सेना यांनी विचार करायला हवा. एमआयएमला मानणाराही एक मोठा वर्ग आहे. आम्हाला जर सोबत घेतले तर तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही आम्हाला जितक्या जागा द्याल तिथे नक्कीच आम्हाला फायदा होणार पण त्याच्या कित्येक पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे याचाही विचार करावा असंही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
"बेपत्ता मुलींचा शोध घ्या"
दरम्यान, राज्यातील गायब झालेल्या मुलींच्या शोधासाठी सरकारने विशेष टास्क फोर्स स्थापन करावा. बेपत्ता मुलींचा शोध घण्यासाठी एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करावी. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी योजना आणली असेल तर बेपत्ता झालेल्या बहिणींसाठीही मोहिम हाती घ्या. २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या १२८ मुली घरातून गायब झाल्यात. २०२४ मध्ये शहरातील १०६ आणि जिल्ह्यातून १०५ मुली आतापर्यंत बेपत्ता झाल्यात. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन मोहिम हाती घेत मुलींना शोधण्याचं काम सुरू करावे असं आवाहन करत इम्तियाज जलील यांनी सरकारकडे मुलींचा शोध घेण्याची मागणी केली आहे.