“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:30 IST2026-01-11T12:27:40+5:302026-01-11T12:30:29+5:30
Deputy CM Eknath Shinde News: आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद महायुतीलाच मिळेल आणि पालिकेवर भगवा फडकेल असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे त्यामुळेच इथली गर्दी पाहून विरोधकांची बोलती बंद झाली असेल. या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही नुसती प्रचारसभा नसून विजयाची सभा असल्याचे मत व्यक्त केले. कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे, इथे माती लावूनच मैदानात उतरावे लागते,महायुतीचे उमेदवार पूर्ण ताकतीने मैदानात उतरले असून विजयश्री खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला. रामाने १४ वर्षाचा वनवास सहन केला होता तर कोल्हापूरकरांनी १५ वर्षांचा काँग्रेस राजवटीचा वनवास सहन केला आहे त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून महायुतीला मत देऊन परिवर्तन घडवावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र
कोल्हापूर अनेक कृषी, कुस्ती,सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याचा लौकिक असाच उन्नत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. इथल्या तरुणाच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी फक्त सभेसाठी कोल्हापुरात येत नाही तर जेव्हा महापूर आला तेव्हाही कोल्हापुरात आलो, तेव्हा येथील जनतेचे प्रेम आणि आपुलकीचा अनुभव मी घेतला. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवास जीव देऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे. त्यामुळे नुसते फेसबुक लाईव्ह करणे आणि फेस टू फेस भेटणे यात फरक असल्याचे मत व्यक्त केले.
कोल्हापूरचे एकही काम पैशांअभावी थांबू देणार नाही
कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी मित्राच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प तयार झाला आहे. ३०० कोटींच्या कन्व्हेंशन सेंटरचे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी रिंग रोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर चित्रनगरी आद्ययावत करतोय. फाईव्ह स्टार हॉटेल आय टी कंपनी सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर नवीन प्रशासकीय इमारत, अमृत २ योजनेचे पैसे असो कोल्हापूरचे एकही काम पैशांअभावी थांबू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
दरम्यान, कोल्हापुरातील नाट्य आणि कला संस्कृती जपण्यासाठी कायम प्राधान्य दिले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग येथील मैदानाचा सुशोभीकरणासाठी ४० कोटी रुपये दिले, जुन्या नाट्यगृहाचे साडे सात कोटींचे काम पूर्ण केले, छत्रपती शाहू महाराजांचे समाधीस्थळासाठी डॉ. आंबेडकर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आपण निधी दिलाय, रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी २० कोटी दिले. शिंगणापूर पंपिंग स्टेशनसाठी साडे तीन कोटी दिले, शहरातील १६ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासाठी १०० बसेस मंजूर केल्या त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर साडे पाच कोटी खर्चून टर्फ तयार केले आहे. महालक्ष्मी मंदिराभोवती १२० आकर्षक विद्युत खांब बसवले, पंचगंगा घाटावर रोषणाई केल्याने कोल्हापूरच्या वैभवात अधिक भर पडली आहे. पालिकेतील ४ हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधला आपण मंजुरी दिली, केएमटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देऊन सातवा वेतन आयोग लागू केला, तसेच प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.