उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:04 IST2026-01-06T19:01:40+5:302026-01-06T19:04:45+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, यंदाच्या रिंगणात कमालीची विविधता पाहायला मिळत आहे.

उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण?
उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, यंदाच्या रिंगणात कमालीची विविधता पाहायला मिळत आहे. पीआरपीच्या अक्षता टाले या सर्वात तरुण उमेदवार म्हणून लक्ष वेधून घेत आहेत, तर दुसरीकडे शिंदेसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार म्हणून अनुभवाच्या जोरावर मैदानात उतरले आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागेसाठी तब्बल ४३२ उमेदवार रिंगणात उतरले असून बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीत २४ ते २८ वयोगटातील उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवणाऱ्या अक्षता टाले या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या असून त्या २४ वर्षाच्या आहेत. अक्षता उच्चशिक्षित आणि सिनेकलाकारही आहेत. त्यांचे वडील प्रमोद टाले हे अनुभवी नगरसेवक आहेत, तर त्यांचा मोठा भाऊ युपीएससी परीक्षा पास होऊन रेल्वेमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. तसेच निकिता छाप्रू, गुंजन साधवानी, डॉ. संजीवनी कांबळे, आईशा वधारिया, युवराज पाटील, मयूर लहाने आणि गौतमी बागुल हे २४ ते २८ वयोगटातील तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ उमेदवारांचे वर्चस्वही कायम
शिंदेसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर हे सर्वाधिक जेष्ठ उमेदवार असून त्यांचे वय ६७ आहे. शिंदेसेनेचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले भुल्लर सीब्लॉक परिसरातून सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, यंदा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. भुल्लर यांच्यासह दिलीप गायकवाड, इंदिरा उदासी, महेश सुखरामानी, किशोर वनवारी, जीवन इदनानी, अंजली साळवे, शोभा जाधव, आशा इदनानी, चरणजीत कौर भुल्लर आणि लता पगारे आदींनी ६० वर्षांवरील ज्येष्ठ उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली आहे.
निवडणुकीचे मुख्य आकर्षण : ४० ते ५५ वयोगट
निवडणुकीत चर्चा तरुण आणि वृद्ध उमेदवारांची होत असली, तरी प्रतिज्ञापत्रानुसार आकडेवारीनुसार सर्वाधिक उमेदवार हे ४० ते ५५ वयोगटातील आहेत. हा मधला गटच महापालिकेच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.