योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 21:37 IST2024-10-18T21:19:51+5:302024-10-18T21:37:01+5:30
योजनादूतांमार्फत कोणतेही प्रचार कार्य होणार नाही आणि त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा मिळणार नाही.

योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या काळात शासकीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी करता येणार नाही. त्यामुळे योजनादूतांमार्फत कोणतेही प्रचार कार्य होणार नाही आणि त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा मिळणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत होती. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात आली. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार होते. मात्र आता निवडणूक आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत कोणतेही प्रचार कार्य होणार नाही आणि त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा मिळणार नाही. जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
योजनादूतांसाठी कोणत्या होत्या अटी?
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक होते.